जिवंत बाळाला केलं मृत घोषित, डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 08:42 AM2017-12-04T08:42:18+5:302017-12-04T08:44:21+5:30
जिवंत बाळाला मृत घोषित केल्याप्रकरणी दोन डॉक्टरांचं निलंबन करण्याचा निर्णय मॅक्स हेल्थकेअर रुग्णालयाने घेतला आहे. शनिवारी रुग्णालयाची यासंबंधी बैठक पार पडली. या बैठकीत निष्काळजी डॉक्टरांचं निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नवी दिल्ली - जिवंत बाळाला मृत घोषित केल्याप्रकरणी दोन डॉक्टरांचं निलंबन करण्याचा निर्णय मॅक्स हेल्थकेअर रुग्णालयाने घेतला आहे. शनिवारी रुग्णालयाची यासंबंधी बैठक पार पडली. या बैठकीत निष्काळजी डॉक्टरांचं निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला. एपी मेहता आणि विशाल गुप्ता अशी या डॉक्टरांची नावे आहेत. 'घटनेची चौकशी अद्याप सुरु असून यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनही सहभागी आहे. मात्र तोपर्यंत आम्ही दोन्ही डॉक्टरांच्या निलंबनाचा निर्णय घेतला आहे', अशी माहिती मॅक्स हेल्थकेअरकडून देण्यात आली आहे.
मॅक्स हेल्थकेअर रुग्णालयात जिवंत बाळाला मृत घोषित केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. इतकंच नाही तर जन्माला आलेली जुळी मुले मृत असल्याचं सांगत चक्क प्लास्टिकच्या पिशवीत बंद करुन सोपवण्यात आलं होतं.
मॅक्स हॉस्पिटलमध्ये गुरुवारी महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. यामधील एक मुलगा होती तर दुसरी मुलगी. प्रसूतीदरम्यान मुलीचा मृत्यू झाल्याचं कुटुंबियांना सांगण्यात आलं होतं. जुळ्या बाळांचा जन्म झाल्यानंतर त्यामधील एक बाळ जिवंत असून त्याची खूप काळजी घेण्याची गरज असल्याचं सांगण्यात आलं. बाळाला नर्सरीमध्ये ठेवण्याचा सल्ला कुटुंबाला देण्यात आला. नेमकं काय करायचं यावर कुटुंबिय चर्चा करत असतानाच, दुस-या बाळाचाही मृत्यू झाला आहे असं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं.
रुग्णालयाने दोन्ही बाळांचा मृतदेह एका कागद आणि कपड्यात गुंडाळला, आणि चिकटपट्टी लावून एका प्लास्टिकच्या पिशवीतून नातेवाईकांकडे सोपवला. बाळांना मृत घोषित केल्यानंतर कुटुंब अंत्यसंस्कारासाठी जात असताना एक बाळ हालचाल करत असल्याचं कुटुंबियांच्या लक्षात आलं. यानंतर त्यांनी तात्काळ काश्मीरी गेट परिसरातील रुग्णालयात धाव घेतली. तिथे बाळ जिवंत असल्याचं सांगण्यात आलं.
'रस्त्यात चालत असताना हालचाल होत असल्याचं लक्षात येताच आम्ही कागद फाडून पाहिलं तर आतमध्ये बाळ जिवंत असल्याचं पाहिलं. आम्ही बाळाला अग्रवाल रुग्णालयात दाखल केलं आहे', असं बाळाच्या आजोबांनी सांगितलं होतं.