भारतीयांच्या बचतीत घट; कोरोना लाटेमुळे परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 08:10 AM2021-06-25T08:10:38+5:302021-06-25T08:10:56+5:30
नुकत्याच सरलेल्या आर्थिक वर्षात बचतीची गंगाजळी आटली असल्याचे आढळून आले.
हातात आलेल्या पैशांतून ठरावीक रकमेची बचत करणे, हा भारतीयांचा स्थायीभाव. मात्र, कोरोनामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेत भारतीयांच्या बचतीला गळती लागल्याचा अहवाल नुकताच भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केला. त्यानुसार नुकत्याच सरलेल्या आर्थिक वर्षात बचतीची गंगाजळी आटली असल्याचे आढळून आले.
कशी झाली घट?
रोजगार आटल्याने बँकेतील जमापूँजीवर सर्व भिस्त आली. त्यामुळे बँकेतील ठेवींवर परिणाम झाला. गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत बँकेतील ठेवींचे प्रमाण जीडीपीच्या ७.७ टक्के एवढे होते. ते तिसऱ्या तिमाहीत ३ टक्क्यांवर आले. पहिल्या तिमाहीत बँक ठेवी १.१३ लाख कोटींच्या होत्या. मात्र, दुसऱ्या तिमाहीत त्या ३.६२ लाख कोटींपर्यंत पोहोचल्या होत्या. तिसऱ्या तिमाहीत मात्र त्यात कमालीची घट झाली.
कर्जाचे प्रमाण वाढले
जीडीपीच्या प्रमाणात घरगुती कर्जांचे प्रमाण ८० बेसिस पॉइंट्सने वाढले.लघुवित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्याच्या प्रमाण घटले. परंतु बँकांकडून कर्ज घेणे वाढले. सप्टेंबर, २०२० ला संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत हे प्रमाण ३.२ टक्के होते परंतु डिसेंबरात संपलेल्या तिमाहीत तेच ४ टक्क्यांपर्यंत वाढले.
घट का झाली?
कोरोनाकाळात देशभरात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अर्थचक्र मंदावले. अनेक उद्योगांनी मनुष्यबळात कपात किंवा
उपलब्ध मनुष्यबळाच्या पगारात कपात करण्याचे सत्र आरंभले.त्यामुळे अनेकांचे एकतर रोजगार तरी बुडाले अथवा उत्पन्नात घट झाली.अस्थिरता निर्माण झाल्याने बचतही आटली.लोकांची क्रयशक्ती घटली तरी बचतीत नकारात्मकता आली.
बचतीचे हे प्रमाण राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या (जीडीपी) ८.२ टक्के एवढे खाली आले.
बचतीच्या प्रमाणात किती घसरण झाली?
२०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत घरगुती बचतीच्या प्रमाणात निम्म्याने घट झाली.पहिल्या तिमाहीत हे प्रमाण जीडीपीच्या २१.४ टक्के एवढे घसघशीत होते. आकड्यात सांगायचे झाल्यास पहिल्या तिमाहीत लोकांकडे ८.१६ लाख कोटी रुपयांची बचत होती.ती डिसेंबरच्या अखेरीस निम्म्यावर म्हणजेच ४.४४ लाख कोटी वर आली.दुसऱ्या तिमाहीतही परिस्थिती बरी होती. बचतीचे प्रमाण या काळात जीडीपीच्या १०.२ टक्के एवढे होते.