Sita Soren : "माझ्या विरोधात मोठा कट..."; हेमंत सोरेन यांची वहिनी सीता सोरेन यांचा JMMच्या सर्व पदांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 12:46 PM2024-03-19T12:46:24+5:302024-03-19T12:54:40+5:30
Sita Soren : झारखंड मुक्ती मोर्चाच्या आमदार सीता सोरेन यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी एक पत्र पक्षाध्यक्षांना म्हणजेच त्यांचे सासरे शिबू सोरेन यांना पाठवलं आहे.
झारखंड मुक्ती मोर्चाच्या आमदार सीता सोरेन यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी एक पत्र पक्षाध्यक्षांना म्हणजेच त्यांचे सासरे शिबू सोरेन यांना पाठवलं आहे. सीता सोरेन म्हणाल्या की, "माझ्या आणि माझ्या कुटुंबाविरोधात मोठा कट रचला जात आहे. मी झारखंड मुक्ती मोर्चाची केंद्रीय महासचिव आणि सक्रिय सदस्य आहे. सध्या मी पक्षाची आमदार आहे. अत्यंत दुःखी अंत:करणाने मी माझा राजीनामा सादर करत आहे."
"माझे दिवंगत पती दुर्गा सोरेन हे झारखंड आंदोलनाचे अग्रणी योद्धे आणि महान क्रांतिकारक होते. त्यांच्या मृत्यूनंतर माझ्याकडे आणि माझ्या कुटुंबीयांकडे सातत्याने दुर्लक्ष केलं जात आहे. पक्ष आणि कुटुंबीयांनी आम्हाला एकटं पाडलं आहे, जे माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक होतं. कालांतराने परिस्थिती सुधारेल अशी मला आशा होती. पण दुर्दैवाने तसे झाले नाही."
"झारखंड मुक्ती मोर्चाला माझ्या पतीने त्याग आणि समर्पण आणि नेतृत्व क्षमता यांच्या बळावर एक महान पक्ष म्हणून उभं केलं. आज तो पक्ष राहिला नाही. ज्यांची दृष्टी आणि उद्दिष्टे आपल्या मूल्ये आणि आदर्शांशी जुळत नाहीत अशा लोकांच्या हातात पक्ष आता गेला आहे हे पाहून मला खूप दुःख झालं."
"शिबू सोरेन (गुरुजी बाबा) यांनी आम्हा सर्वांना एकत्र ठेवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. दुर्दैवाने, अथक प्रयत्न करूनही ते अयशस्वी झाले. माझ्या आणि माझ्या कुटुंबाविरुद्ध एक मोठा कट रचला जात असल्याचे मला नुकतेच कळाले आहे. मी अत्यंत दुःखी आहे. झारखंड मुक्ती मोर्चा आणि या कुटुंबाला सोडायचे आहे, असे मी ठामपणे ठरवले आहे."
"मी माझ्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मी तुमची आणि पक्षाची सदैव ऋणी राहीन. माझ्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत" असं देखील सीता सोरेन यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. हेमंत सोरेन यांना 31 जानेवारी रोजी अटक केली आहे. जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ते अडकले असून सध्या जेलमध्ये आहेत.