Deep Sidhu: दिप सिद्धूचा अपघात की घातपात? पोलिसांनी ट्रकचालकास घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 11:47 AM2022-02-18T11:47:39+5:302022-02-18T11:49:19+5:30
दीप आणि त्याची गर्लफ्रेंड रीना दोघेही कारमधून पंजाबला येत असताना कुंडली-मानेसर-पलवल एक्स्प्रेस वेवर पिपली टोलनाक्याजवळ हा भीषण अपघात झाला
चंडीगढ - पंजाबी अभिनेता दीप सिद्धू (Deep Sidhu) याचा कार अपघातात मृत्यू झाला. मंगळवारी दिल्लीहून पंजाबला जात असताना दीपच्या कारची ट्रकला जोरदार धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, त्याचा जागीच मृत्यू झाला. धडकेत गाडीच्या पुढील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याचे फोटोमध्ये पाहायला मिळाले. याप्रकरणी ट्रकचालक फरार झाला होता, आता पोलिसांनी या ट्रकचालकास अटक केली आहे.
दीप आणि त्याची गर्लफ्रेंड रीना दोघेही कारमधून पंजाबला येत असताना कुंडली-मानेसर-पलवल एक्स्प्रेस वेवर पिपली टोलनाक्याजवळ हा भीषण अपघात झाला. कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला जाहीर पाठींबा दिल्यानंतर दीप सिद्धू चर्चेत आला होता. या अपघातातून सुदैवाने त्याची गर्लफ्रेंड रीना रॉय बचावली. या अपघातानंतर ज्या ट्रकने दीपच्या कारला धडक दिली, तो ट्रकचालक फरार झाला होता. पोलिसांनी आता ड्रायव्हरला अटक केली असून त्याचं नाव कासिम आहे. कासिम हा हरयाणातील नहू गावचा रहिवाशी आहे. त्यास आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
दीप सिद्धूच्या भावाने ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दीपच्या कुटुंबीयांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सुरुवातीला ट्रक रस्त्याच्या कडेला थांबला होता, अशी माहिती समोर आली होती. मात्र, ट्रक रस्त्याच्या कडेला नसून दीपची गाडी वेगात पुढे जात होती, असे समोर आले आहे. दरम्यान, दीपची गर्लफ्रेंड रिना रॉयने दीपकला डुलकी आल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून चालकाच्या चौकशीतून अनेक पैलू समोर येतील.
कोण होता दीप सिद्धू?
दीप सिद्धू हा पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्याचा रहिवासी होता. कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने किंगफिशर मॉडेल हंट अवॉर्ड जिंकला होता. त्यानंतर त्याने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. 2015 मध्ये त्याचा पहिला सिनेमा ‘रमता जोगी’ रिलीज झाला. मात्र सिद्धूला 2018 मधील ‘जोरा दास नम्ब्रिया’ या पंजाबी चित्रपटातून मोठी ओळख मिळाली.