दिल्लीत शेतकऱ्यांना भडकवण्याचा आरोप असलेला दिप सिद्धू कोण आहे? त्यानं खरंच भडकावलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 09:13 AM2021-01-27T09:13:02+5:302021-01-27T09:16:28+5:30

शेतकरी नेत्यांनी दिप सिद्धू यांच्यावर शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप केला आहे.

deep sidhu who is accused of inciting violence on the red fort while tractor rally | दिल्लीत शेतकऱ्यांना भडकवण्याचा आरोप असलेला दिप सिद्धू कोण आहे? त्यानं खरंच भडकावलं?

दिल्लीत शेतकऱ्यांना भडकवण्याचा आरोप असलेला दिप सिद्धू कोण आहे? त्यानं खरंच भडकावलं?

googlenewsNext

प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये मोठा हिंसाचार झाला. यात दिल्लीच्या रस्त्यांवर शेतकऱ्यांचं आक्रमक रुप पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी शेतकरी आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. शेतकरी आंदोलन करणाऱ्या नेत्यांकडून हिंसक घटनांचा निषेध व्यक्त करण्यात येत असून त्यांनी हिंसा भडकावण्याचं काम केल्याचा काही जणांवर आरोप केला आहे.

शेतकरी नेत्यांनी दिप सिद्धू यांच्यावर शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप केला आहे. त्यावर दिप सिद्धू यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "आंदोलनकर्त्यांनी लोकशाहीच्या अधिकारानुसारच लाल किल्ल्यावर निशान साहिबचा झेंडा फडकावला. आम्ही भारतीय झेंडा हटवला नाही", असं दिप सिद्धू यांनी म्हटलं आहे. यासोबतच त्यानं फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

दिप सिद्धू गेल्या नोव्हेंबरपासून कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनात सक्रिय आहेत. "आंदोलनामुळे लोकांचा रोष वाढला आणि आंदोलकांना भडकवण्यासाठी कुठल्या एका व्यक्तीला जबाबदार ठरवलं जाऊ शकत नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून आमचे शेतकरी प्रदर्शन करत आहेत आणि आज जे झालं ते त्याला वेगळ्या पद्धतीनं पाहिलं जाऊ शकत नाही", असं दिप सिद्धू म्हणाले. 

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनीही दिप सिद्धू यांच्यावर आरोप केले आहेत. "दिपू सिद्धू आणि गँगस्टर ते नेता असा प्रवास केलेल्या लखा सिधाना यांनी काल रात्री सिंघू सीमेवर शेतकऱ्यांना भडकावण्याचं काम केलं", असा थेट आरोप यादव यांनी केला आहे. यासोबतच एक मायक्रोफोन घेऊन दिप सिद्धू लाल किल्ल्यापर्यंत कसा पोहोचला याचीही चौकशी व्हायला हवी, असंही ते पुढे म्हणाले. योगेंद्र यादव यांच्यासोबच भारतीय किसान युनियनचे हरियाणा प्रदेश अध्यक्ष गुरनाम सिंह यांनीही दिप सिद्धू यांच्यावर शेतकऱ्यांना भडकावून त्यांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. 

कोण आहे दिप सिद्धू?
दिप सिद्धू यांचा जन्म १९८४ साली पंजाबच्या मुक्तसर जिल्ह्यात झाला. त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आहे. किंगफिशर मॉडल हंट हा पुरस्कार जिंकण्यापूर्वी ते बारचे सदस्य देखील होते. २०१५ मध्ये दिप सिद्धू यांचा पहिला पंजाबी सिनेमा- रमता जोगी प्रदर्शित झाला. तर २०१८ मधील सिनेमा ‘जोरा दास नम्ब्रिया’मुळे त्यांची लोकप्रियता वाढली. या सिनेमात त्यांनी गँगस्टरची भूमिका साकारली होती.

विशेष म्हणजे, २०१९ साली अभिनेते सनी देओल यांनी गुरुदासपूरमधून लोकसभेची निवडणूक लढवली त्यावेळी देओल यांनी आपल्या निवडणूक प्रचाराच्या टीममध्ये दिप सिद्धू यांनाही सामील केलं होतं. दरम्यान, लाल किल्ल्यावरील हिंसाचाराच्या घटनेनंतर सनी देओल यांनी ट्विट करत "माझा किंवा माझ्या संपूर्ण कुटुंबाचा दिप सिद्धू यांच्याशी कोणताही संबंध नाही", असं स्पष्ट केलं आहे. 

शेतकरी आंदोलनात कसे पोहोचले दिप सिद्धू
देशातील काही सामाजिक कार्यकर्ते आणि सिनेक्षेत्रातील कलाकारांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. त्यानुसार २५ डिसेंबर रोजी अनेक कलाकार सिंघू सीमेवर पोहोचले होते. त्यातच दिप सिद्धू देखील होते. त्यांनी शेतकऱ्यांसोबतच धरण आंदोलनाला बसण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांना शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याचं आवाहनही सोशल मीडियातून केलं. 

दरम्यान, अनेकांनी दिप सिद्ध यांच्या सहभागाबद्दल आक्षेप घेतला होता. नरेंद्र मोदी आणि सनी देओल यांच्यासोबतचा दिप सिद्धू यांचा फोटो व्हायरल करत ते भाजपचे एजंट असल्याची टीका केली गेली होती. मात्र दिप सिद्धू यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले होते. 

Read in English

Web Title: deep sidhu who is accused of inciting violence on the red fort while tractor rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.