"मी गुपित सांगण्यास सुरुवात केली तर..."; दिल्ली हिंसाचाराचा आरोप असलेल्या दिप सिद्धूचा इशारा
By मुकेश चव्हाण | Published: January 29, 2021 05:56 PM2021-01-29T17:56:25+5:302021-01-29T18:05:05+5:30
हिंसाचाराला चिथावणी देऊन शेतकरी आंदोलनाला बदनाम केल्याचा आरोप दिप सिद्धूने फेटाळून लावले आहेत.
नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये मोठा हिंसाचार झाला. यात दिल्लीच्या रस्त्यांवर शेतकऱ्यांचं आक्रमक रुप पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी शेतकरी आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. शेतकरी आंदोलन करणाऱ्या नेत्यांकडून हिंसक घटनांचा निषेध व्यक्त करण्यात येत असून त्यांनी हिंसा भडकावण्याचं काम केल्याचा काही जणांवर आरोप केला आहे. यामध्ये दिप सिद्धू यांचं देखील नाव पुढे येत आहे. मात्र हिंसाचाराला चिथावणी देऊन शेतकरी आंदोलनाला बदनाम केल्याचा आरोप दिप सिद्धूने फेटाळून लावले आहेत.
तुम्ही निर्लज्जपणे मला जबाबदार धरताय. तुमच्या निर्णयाच्या आधारावर लोक संकल्प करुन, ट्रॅक्टर मोर्चासाठी दिल्लीत आले होते. लोक तुमचा शब्द मानतात. लाखो लोक माझ्या नियंत्रणाखाली कसे राहू शकतात? मी लाखो लोकांना चिथावणी देऊ शकतो, मग तुमचं महत्त्व काय ? दिप सिद्धूला कोणी मानत नाही, त्याचं योगदान नाही. मग मी लाखो लोकांना घेऊन तिथे आलो, हे तुम्ही कसं म्हणू शकता, असा सवाल दिप सिद्धूने उपस्थित केला आहे. तसेच मी गुपित सांगायला सुरुवात केली, तर संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांना कुठे लपायच ते समजणार नाही, असा इशारा देखील दीप सिद्धूने दिला आहे.
शेतकरी नेत्यांनी दिप सिद्धू यांच्यावर शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप केला आहे. त्यावर दिप सिद्धू यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "आंदोलनकर्त्यांनी लोकशाहीच्या अधिकारानुसारच लाल किल्ल्यावर निशान साहिबचा झेंडा फडकावला. आम्ही भारतीय झेंडा हटवला नाही", असं दिप सिद्धू यांनी म्हटलं आहे. यासोबतच त्यानं फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
दिप सिद्धू गेल्या नोव्हेंबरपासून कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनात सक्रिय आहेत. "आंदोलनामुळे लोकांचा रोष वाढला आणि आंदोलकांना भडकवण्यासाठी कुठल्या एका व्यक्तीला जबाबदार ठरवलं जाऊ शकत नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून आमचे शेतकरी प्रदर्शन करत आहेत आणि आज जे झालं ते त्याला वेगळ्या पद्धतीनं पाहिलं जाऊ शकत नाही", असं दिप सिद्धू यांनी सांगितले.
कोण आहे दिप सिद्धू?
दिप सिद्धू यांचा जन्म १९८४ साली पंजाबच्या मुक्तसर जिल्ह्यात झाला. त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आहे. किंगफिशर मॉडल हंट हा पुरस्कार जिंकण्यापूर्वी ते बारचे सदस्य देखील होते. २०१५ मध्ये दिप सिद्धू यांचा पहिला पंजाबी सिनेमा- रमता जोगी प्रदर्शित झाला. तर २०१८ मधील सिनेमा ‘जोरा दास नम्ब्रिया’मुळे त्यांची लोकप्रियता वाढली. या सिनेमात त्यांनी गँगस्टरची भूमिका साकारली होती.
शेतकरी आंदोलनात कसे पोहोचले दिप सिद्धू
देशातील काही सामाजिक कार्यकर्ते आणि सिनेक्षेत्रातील कलाकारांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. त्यानुसार २५ डिसेंबर रोजी अनेक कलाकार सिंघू सीमेवर पोहोचले होते. त्यातच दिप सिद्धू देखील होते. त्यांनी शेतकऱ्यांसोबतच धरण आंदोलनाला बसण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांना शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याचं आवाहनही सोशल मीडियातून केलं.