दीपेशला बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतले नाही-एनसीबी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 06:31 AM2020-11-24T06:31:24+5:302020-11-24T06:31:46+5:30
सुशांतसिंह राजपूतप्रकरण
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू, ड्रग्ज प्रकरणी त्याचा कर्मचारी दीपेश सावंतला बेकायदा ताब्यात घेतल्याचा आरोप नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) उच्च न्यायालयात सोमवारी फेटाळला. आपल्याला एनसीबीने बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतल्याचा दावा दीपेश सावंत याने करत १० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. न्या. एस.एस. शिंदे व न्या. एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सोमवारी या याचिकेवर सुनावणी होती. एनसीबीतर्फे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी उच्च न्यायालयात सावंत याने केलेले सर्व आरोप फेटाळले.
मला ४ सप्टेंबला अटक केली. कायद्यानुसार न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे ५ सप्टेंबर रोजी हजर करायला हवे होते. मात्र, ६ सप्टेंबर रोजी हजर केले, असे सावंतने म्हटले आहे. त्यावर सावंतला ५ सप्टेंबर रोजीच अटक केली. अटकेनंतर कुटुंबाला काॅल करु दिला. दुसऱ्या दिवशी नाश्ता दिला. मग अटक बेकायदा कशी, असा सवाल सिंग यांनी केला. स्वतंत्र यंत्रणा चौकशी करत नाही, तोपर्यंत याबाबत निर्णय घेऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले. तसेच सुनावणी ४ डिसेंबर रोजी ठेवली.