CM योगी आदित्यनाथांचा बनवला डीपफेक व्हिडीओ, गुन्हा दाखल; व्हिडीओत नेमकं काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 15:00 IST2025-02-13T14:58:02+5:302025-02-13T15:00:30+5:30
Yogi Adityaanth Deepfake Video: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेत आहेत.

CM योगी आदित्यनाथांचा बनवला डीपफेक व्हिडीओ, गुन्हा दाखल; व्हिडीओत नेमकं काय?
Yogi adityaanth deepfake News: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ डीपफेक असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखनौमधील हजरतगंज पोलीस ठाण्यात भाजप नेत्याने तक्रार दिली होती.
प्यारा इस्लाम असे नाव असलेल्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या डीपफेक असलेल्या या व्हिडीओत योगी आदित्यनाथ यांना मुस्लीम टोपी घातलेले दाखवण्यात आले आहे.
डीपफेक व्हिडीओमध्ये काय?
डीपफेक व्हिडीओत मुस्लीम टोपी घालून योगी आदित्यनाथ दिसत असून, बाजूला आणखी एक व्यक्ती उभा असल्याचे दिसत आहे. गाणेही वाजत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी व्हिडीओ शेअर करणाऱ्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम ३५२, ३५३, १९६ (१), २९९ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
एआयच्या मदतीने योगी आदित्यनाथ यांचा डीपफेक व्हिडीओ बनवण्यात आला असून, भाजप पदाधिकाऱ्याच्या निदर्शनास आला होता.
हजरतगंजचे नरही परिसरातील भाजपचे पदाधिकारी राजकुमार तिवारी यांनी व्हिडीओ बघितला. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली. हजरतगंज पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने गुन्हा दाखल करून घेत आरोपीचा शोध सुरू केला आहे.
योगींचा पूर्वीही बनवला गेला होता डीपफेक व्हिडीओ
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा डीपफेक व्हिडीओ बनवण्याचा हा पहिलाच प्रकार नाही. यापूर्वीही एकदा डीपफेक व्हिडीओ बनवण्यात आला होता. या प्रकरणात उत्तर प्रदेश एसटीएफने एका व्यक्तीला अटक केली होती. शाम गुप्ता असे त्याचे नाव होते.