एक-दोन नव्हे तर तब्बल 300 कट्सनंतर प्रदर्शित होणार 'पद्मावत'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2018 11:30 AM2018-01-09T11:30:35+5:302018-01-09T12:08:41+5:30
पद्मावत सिनेमाबद्दलची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबई- दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित पद्मावती या सिनेमाचं नाव बदलून आता पद्मावत करण्यात आलं आहे. एखाद्या सिनेमात पाच ते सहा बदल करून सिनेमा प्रदर्शनाला मंजुरी दिली जाते. पण पद्मावत सिनेमाबद्दलची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भन्साळीच्या 'पद्मावत'मध्ये सेन्सॉर बोर्डाने ५ बदल सुचविल्याचं सांगण्यात येतं. मात्र प्रत्यक्षात 'पद्मावत'मध्ये पाच नसून ३००हून अधिक बदल करण्यात आले आहेत.
मुंबई मिररच्या वृत्तानुसार, सिनेमामध्ये जिथेही मेवाड, दिल्ली आणि चित्तोड या शब्दांचा उल्लेख असेल ते शब्द कट केले जाणार आहेत. याचाअर्थ प्रेक्षक जेव्हा मोठ्या पडद्यावर हा सिनेमा पाहतील तेव्हा जी कहाणी ते पाहत आहेत, ती वास्तवात कुठे घडली आहे, याचा अर्थच प्रेक्षकांना उलगडणार नाही. पद्मावत सिनेमा पुन्हा एडिट करण्यासाठी एडिटर्स दिवस-रात्र एक करून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. सिनेमाबद्दल आत्तापर्यंत घडलेली प्रत्येक घडामोड प्रेक्षकांना सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच समजणार आहे. सिनेमा नेमका कशा प्रकारे असेल हे आता 25 जानेवारीला समजणार आहे.
2018च्या सुरूवातील सिनेमाच्या प्रदर्शनाबद्दल प्रेक्षकांना थोड्या अपेक्षा होत्या. स्पेशल कमिटीच्या सहाय्याने सेन्सॉर बोर्डाने पाच संशोधनानंतर सिनेमाला U/A सर्टिफिकेटसह प्रदर्शनाला हिरवा कंदील दिला.
पद्मावत या सिनेमात अभिनेत्री दीपिका पादूकोण हिने राणी पद्ममिनीची भूमिका साकारली असून अभिनेता शाहिद कपूर महारावल रतन सिंह आणि रणवीर सिंह अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत आहे. हा सिनेमा 1 डिसेंबर 2017 रोजी प्रदर्शित होणार होता पण सिनेमाला होणार विरोध पाहता सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.