दीपिका पदुकोनच्या जेएनयु भेटीवरून राजकारण तापले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 05:12 AM2020-01-09T05:12:39+5:302020-01-09T05:12:51+5:30
चित्रपट अभिनेत्री दीपिका पदुकोनने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला भेट दिल्यामुळे नवे राजकीय युद्ध सुरू झाले आहे.
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : चित्रपट अभिनेत्री दीपिका पदुकोनने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला भेट दिल्यामुळे नवे राजकीय युद्ध सुरू झाले आहे. भाजपने दीपिकाचा चित्रपट ‘छपाक’ वर बहिष्कार घालण्याचे फरमान जारी केले आहे तर काँग्रेस दीपिकाच्या पाठिशी उभा आहे.
भाजपचे जे नेते दीपिकाला विरोध करून तिच्या चित्रपटावर बहिष्काराचे आवाहन करीत आहेत त्यांच्यावर काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल, रणदीप सूरजेवाला, पवन खेडा यांच्यासह अनेक नेत्यांनी टीका केली आहे. सूरजेवाला यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की ‘‘भारताच्या आत्म्याला चिरडणे बंद करा, तुम्ही आणि भक्त कोणत्याही कलाकाराला विरोध नाही करू शकत नाहीत. ‘छपाक’ पदुकोनचाच चित्रपट नाही तर ज्या हजारों महिलांवर अॅसिड हल्ले झाले त्यांचाही आहे.’’ सिब्बल म्हणाले की, ‘‘कोणताही अभिनेता किंवा अभिनेत्री कोणाच्या पाठिशी उभी ठाकली तर हे लोक त्याला राष्ट्रविरोधी वा देशद्रोही जाहीर करतात.’’
दुसरीकडे भाजपचे खासदार रामवीर सिंह विदुडी यांनी दीपिकाचा चित्रपट ‘छपाक’वर बहिष्कार घालण्याचे जाहीर आवाहन केले. परंतु, माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भारत लोकशाही देश आहे व कोणीही कुठेही जाऊ शकतो, असे म्हणून तो विषय टाळला.
परंतु, सूत्रांनी सांगितले की, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या इशाऱ्यावरून दीपिका व जे अभिनेते व अभिनेत्री सरकारविरोधातआवाज उठवत आहेत त्यांच्यावर दबाब आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचसोबत चित्रपटांवर बहिष्कार टाकण्यासह मागच्या दाराने हादेखील दबाव आणला जात आहे की, सरकारला विरोध करणे बंद करावे अन्यथा त्यांनी परिणामांना तयार राहावे. अर्थात याला औपचारिक दुजोरा मिळू शकलेला नाही.