बदनामी खटला; दिलगिरीस राहुल यांचा नकार
By admin | Published: November 27, 2015 12:31 AM2015-11-27T00:31:23+5:302015-11-27T00:31:23+5:30
महात्मा गांधी यांच्या हत्येस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचा आरोप केल्याबद्दल भिवंडी येथील न्यायालयात सुरु असलेला बदनामीचा खटला दिलगिरी व्यक्त
नवी दिल्ली : महात्मा गांधी यांच्या हत्येस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचा आरोप केल्याबद्दल भिवंडी येथील न्यायालयात सुरु असलेला बदनामीचा खटला दिलगिरी व्यक्त करून मिटविण्यास काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात नकार दिला.
राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून हा खटला हवे तर तुम्ही मिटवू शकता, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयात न्या. दीपक मिश्रा व न्या प्रफुल्ल चंद्र पंत यांच्या खंडपीठाने केली. मात्र अशी दिलगिरी व्यक्त करण्यास राहुल गांधी याच्यावतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी स्पष्ट नकार दिला. दिलगिरी मागून तडजोड करण्याऐवजी मुळात हा खटलाच कसा कायद्याच्या निकषांवर टिकणारा नाही, हे आपण अनेक न्यायनिर्णय व पुराव्यांच्या आधारे सिद्ध करू, असे सिब्बल यांनी सांगितले.
गेल्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावातील प्रचारसभेत केलेल्या या विधानाबद्दल रा. स्व. संघाचे भिवंडी शहर कार्यवाह राजेश कुंटे यांनी तेथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात राहुल गांधींवर हा बदनामीचा फौजदारी खटला गुदरला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यास याआधीच ७ मे रोजी अंतरिम स्थगिती दिली आहे. राहुल गांधींनी आज घेतलेली भूमिका व भिवंडी न्यायालयाने त्यांना येत्या ९ जानेवारीस हजर राहण्याचे समन्स काढले आहे, हे लक्षात घेऊन खंडपीठाने अंतरिम स्थगिती यापुढेही सुरु ठेवली. मूळ फिर्यादी राजेश कुंटे यांनी राहुल गांधीच्या आव्हान याचिकेला चार आठवड्यांत उत्तर सादर करावे, असे सांगून खंडपीठाने सुनावणी १७ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
कुंटे यांनी दाखल केलेला खटला रद्द करावा यासाठी केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयात आले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)