एकीकडे केजरीवालांना मिठाई भरवली; दुसरीकडे मानहानीचा दावा ठोकला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 08:27 AM2019-06-05T08:27:57+5:302019-06-05T08:28:30+5:30
या प्रकरणावर 6 जूनला सुनावणी होणार असून अतिरिक्त मुख्य मेट्रोपोलिटन मजिस्ट्रेट समर विशाल यांच्या समोर हा खटला चालणार आहे.
नवी दिल्ली : दिल्लीचे भाजपाचे विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर अब्रुनुकसानीचा आरोप केला आहे. मंगळवारी गुप्ता यांनी न्यायालयामध्ये दावा दाखल केला आहे. केजरीवाल आणि सिसोदियांनी गुप्ता यांच्यावर आप प्रमुखांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांमध्ये सहभागी असल्याचे म्हटले होते.
या प्रकरणावर 6 जूनला सुनावणी होणार असून अतिरिक्त मुख्य मेट्रोपोलिटन मजिस्ट्रेट समर विशाल यांच्या समोर हा खटला चालणार आहे. तक्रारीमध्ये त्यांनी केजरीवाल आणि शिसोदियांवर एक कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. तसेच खटला लढण्याचा खर्चही मागितला आहे. आप नेत्यांच्या या वक्तव्यामुळे ट्वीटरवर आणि बातम्यांमधून आपल्या प्रतिष्ठेला नुकसान झाले आहे. यावर त्यांनी कोणतीही माफी मागितलेली नाही, असे म्हटले आहे.
2019 च्या निवडणुकीमध्ये राजकीय फायद्यासाठी त्यांनी ही वक्तव्ये केली होती. केजरीवालांच्या हत्येचा आरोप करणे वाईट आहे. मुद्दामहून असे आरोप करण्यात आले. हे आरोप आक्षेपार्हच नाहीत तर मानसिक त्रासदायक आणि मानहानीकारक आहेत. केजरीवालांची हत्या करण्याचा विचारही करू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांना एका आठवड्याच्या आत माफी मागावी असेही म्हटले आहे.
पटियाला हाऊस न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. कारण त्यांनी कायदेशीर नोटिशीला काहीच उत्तर दिलेले नाही. तसेच दोघांविरोधात पोलिसांमध्ये तक्रारही दाखल करण्य़ात आली आहे. यामध्ये केजरीवाल चुकीच्या पद्धतीने अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हटले आहे.