बजरंग दलाची बदनामी, जनताच घेईल बदला; काॅंग्रेसला द्यावा लागेल पापाचा हिशेब - विहिंप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 09:43 AM2023-05-05T09:43:34+5:302023-05-05T09:43:47+5:30
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांनी सत्तेत आल्यानंतर बजरंग दलावर बंदी घालण्याचा पक्षापुढे कोणताही प्रस्ताव नव्हता, असे सांगितल्यानंतर विहिंपचे हे वक्तव्य आले
नवी दिल्ली : बजरंग दलाची बदनामी करून पाप केल्याचे आता काँग्रेसला कळले असले तरी कर्नाटकातील जनता त्यासाठी त्यांना (काँग्रेसला) माफ करणार नाही. या पापाचा हिशेब राज्यातील जनता काँग्रेसकडून १० मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत घेईल, असे विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) गुरुवारी म्हटले आहे. परिषदेने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना हिंदू समाजाची माफी मागून पक्षाचा जाहीरनामा त्वरित बदलण्यास सांगितले आहे.
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांनी सत्तेत आल्यानंतर बजरंग दलावर बंदी घालण्याचा पक्षापुढे कोणताही प्रस्ताव नव्हता, असे सांगितल्यानंतर विहिंपचे हे वक्तव्य आले आहे. बजरंग दल ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न विश्व हिंदू परिषदेची युवा शाखा आहे.
काँग्रेसचा जाहीरनामा जाळला
भाजपचे ज्येष्ठ नेते के. एस. ईश्वरप्पा यांनी गुरुवारी येथे काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्याची प्रत जाळली आणि कर्नाटकात सत्तेत आल्यास बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन दिल्याबद्दल विरोधी पक्षावर टीका केली. बजरंग दल ही ‘देशभक्त संघटना’ असल्याचे सांगून माजी उपमुख्यमंत्री म्हणाले की, “बजरंग दलावर बंदी घालण्याची त्यांची (काँग्रेस) हिंमत कशी झाली?”