वाराणसीत दाेन जागांवर भाजपला पराभवाचा धक्का, सपाची मुसंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 05:11 AM2020-12-07T05:11:13+5:302020-12-07T05:12:45+5:30
BJP News : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या या जागांवर सपाचे आशुताेष सिन्हा आणि लाल बिहारी यादव यांनी विजय मिळविला. गेल्या १० वर्षांपासून या जागा भाजपकडे हाेत्या.
लखनाै : पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या वाराणसी मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला झटका बसला आहे. विधान परिषदेच्या दाेन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार पराभूत झाले असून समाजवादी पार्टीने या जागा जिंकल्या आहेत.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या या जागांवर सपाचे आशुताेष सिन्हा आणि लाल बिहारी यादव यांनी विजय मिळविला. गेल्या १० वर्षांपासून या जागा भाजपकडे हाेत्या. शिक्षक मतदारसंघाच्या सहा आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी निवडणूक झाली. त्यापैकी भाजपाने चार जागांवर आणि सपाने तीन जागांवर विजय मिळविला आहे.
लखनौ पदवीधर मतदार संघातून भाजपचे अविनाश कुमार सिंह हे विजयी झाले. या विजयासोबत भाजपने विधान परिषदेत तीन जागा जिंकल्या. आग्रा पदवीधर मतदारसंघातून भाजपचे डॉ. मानवेंद्र प्रताप सिंह ‘गुरुजी’ आणि दिनेश कुमार गोयल मेरठ मतदार संघातून विजयी झाले. आग्रा आणि फैजाबाद मतदारसंघातून आकाश अग्रवाल आणि ध्रुव कुमार त्रिपाठी हे अपक्ष उमेदवार निवडून आले. १०० जागांच्या विधान परिषदेत समाजवादी पक्षाचे ५५, भाजपचे २५, बहुजन समाज पक्षाचे ८, काँग्रेसचे दोन आणि अपना दलचा एक, दोन शिक्षक दल आणि चार अपक्ष असे संख्या बळ आहे.