पराभव दक्षिणेत आता टेन्शन उत्तरेत; नेत्यांची वानवा; भिस्त मोदी-योगींवरच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 09:18 AM2023-05-16T09:18:37+5:302023-05-16T09:19:05+5:30
...या राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण २३९ जागा असून, त्यापैकी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपनेच १८३ जागा जिंकल्या आहेत.
सुनील चावके -
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रभावी स्थानिक चेहऱ्याअभावी केवळ पंतप्रधान मोदींच्या करिश्म्यावर विसंबून राहिलेल्या भाजपला आता हिंदी भाषक राज्यांमध्येही अशाच आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ वगळता बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, छत्तीसगढ, हरयाणा, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या भाजपचे पूर्ण वर्चस्व असलेल्या राज्यांमध्ये जनाधार असलेल्या नेत्यांची वानवा आहे. परिणामी, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये हिंदी भाषक राज्यांमध्ये भाजपला सर्वस्वी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या करिश्म्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे.
प्रभावी चेहरा कुठे नाही?
भाजपकडे उत्तर प्रदेश वगळता बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, पंजाब, छत्तीसगढ, हरयाणा, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि चंडीगडमध्ये जनाधार असलेले प्रभावी चेहरेच नाहीत. या राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण २३९ जागा असून, त्यापैकी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपनेच १८३ जागा जिंकल्या आहेत.
कुठे काय?
- छत्तीसगड : माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांचा पर्याय देणारा चेहरा नाही.
- झारखंड : भाजपशी जनाधार असलेला चेहरा नाही.
- हरयाणा : सलग नऊ वर्षांपासून मुख्यमंत्री असलेले मनोहरलाल खट्टर यांच्याविषयी जनतेत रोष आहे.
- दिल्ली : आपविरोधात दोन विधानसभा निवडणुकांमध्ये मार खाणाऱ्या भाजपला अजूनही दमदार चेहरा गवसलेला नाही.
- उत्तराखंड : पाच वर्षांत तीन मुख्यमंत्री बदलणाऱ्या भाजपने पुन्हा बहुमत मिळविले असले, तरी मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनाच पराभवाचा धक्का बसला होता.
- हिमाचल प्रदेश : भाजपने अलीकडेच सत्ता गमावली आहे.
- पंजाब : इतर पक्षांशी स्पर्धा करताना भाजपला अजून बस्तान बसविता आलेले नाही.
भाजप धाडस दाखवेल?
मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढून विजय मिळविणे भाजपसाठी दुरापास्त ठरणार आहे. मर्जीतून उतरलेल्या वसुंधरा राजेंऐवजी अन्य नेत्याला पक्षाचे नेतृत्व सोपविण्याचे धाडस भाजपश्रेष्ठींना दाखविता आलेले नाही.