म्यानमारमध्ये लष्कराचा पराभाव, आणखी एका शहरावर बंडखोरांचा ताबा...! 26 लाख लोक विस्थापित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 11:39 AM2024-07-26T11:39:29+5:302024-07-26T11:40:17+5:30
Myanmar Conflict : "सरकारी सैन्यासोबत 23 दिवस चाललेल्या लढाईत आम्ही विजय मिळवला आहे. सरकारी सैन्याचा पराभव करत आम्ही चीनला लागून असलेल्या लॅशियो शहरावर कब्जा केला आहे, असे मॅनमार नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स आर्मीने म्हटले आहे...
म्यानमारमध्ये लष्कराविरोधात जोरदार बंड सुरू आहे. ते थांबण्याचे नाव नाही. या बंडात म्यानमारच्या सैन्याला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत आहे. आता बंडखोरांनी चीन सीमेला लागून असलेल्या एक मुख्य सैनिकी तळावर कब्जा केल्याचे वृत्त आहे. हा म्यानमार सैन्याचा आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव मानला जात आहे. यासंदर्भात बोलताना, "सरकारी सैन्यासोबत 23 दिवस चाललेल्या लढाईत आम्ही विजय मिळवला आहे. सरकारी सैन्याचा पराभव करत आम्ही चीनला लागून असलेल्या लॅशियो शहरावर कब्जा केला आहे, असे मॅनमार नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स आर्मीने म्हटले आहे.
बंडखोरांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांच्या सैनिकांनी विजय मिळवला असून शत्रू सैनिकांना हटवले जात आहे. निवेदनात म्हणण्यात आले आहे की, स्थानिक लोकांनी शांतता पाळावी आणि नियमांचे पालन करावे. महत्वाचे म्हणजे, न्यूज पोर्टल म्यानमार नाऊने म्यानमार नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स आर्मीने लॅशियोमध्ये कब्जा केल्याची पुष्टी केली आहे.
म्यानमारमध्ये अनेक दिवसांपासून सुरू आहे गृह युद्ध -
म्यानमारमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून गृहयुद्ध सुरू आहे. म्यानमार नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स आर्मी एका अशा अल्पसंख्याक बंडखोर गटांपैकी आहे, जो मॅनमारच्या सैनिकांना, ते आपला प्रदेश समजत असलेल्या भूभागातून बाहेर काढण्यासाठी लढत आहे.
यासाठी बंडखोरांनी एक आंदोलनही चालवले होते. ज्याच्या माध्यमाने त्यांनी जुंटाची सत्ता कमकुवत केली. यानंतर या लढाईचे पर्यवसान गृहयुद्धात झाले. संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार, या गृहयुद्धात म्यानमारचे अनेक लोक मारले गेले आहेत, तसेच 26 लाखहून अधिक लोक विस्थापितही झाले आहेत.
पराभव स्वीकारण्यास सैनिक तयार नाहीत -
खरे तर म्यानमारमधील ही लढाई 2021 पासूनच सुरू झाली आहे. येथील अस्थायी लोकशाहीनंतर म्यानमारचे सैन्य 2021 मध्ये पुन्हा सत्तेवर आले. आता हे युद्ध संपूर्ण देशालाच उद्ध्वस्त करत आहे. मात्र म्यानमार सैनिक पराभव स्वीकारण्यास तयार नाहीत. जुंटाने आपल्या विरोधकांना दहशतवादी म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानेही यात हस्तक्षेप केला, मात्र त्याचा काहीही उपयोग होऊ शकला नाही.