'केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंगना पाडू, पार्टी करू'; व्हायरल ऑडिओने भाजपमध्ये खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 12:25 PM2019-04-15T12:25:34+5:302019-04-15T12:34:55+5:30
भाजपाचे 'बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ'चे महानगर सह संयोजक कुलदीप शर्मा यांचा तो व्हिडिओ आहे.
गाझियाबाद : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा पूर्ण ताकद लावून पुन्हा केंद्रात सत्तेत येण्यासाठी काम करत आहे. मात्र, गाझियाबादमधून केंद्रीय मंत्री निवृत्त जनरल व्ही. के. सिंग यांना पाडण्याचे अंतर्गत कारस्थान रचण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबतचा भाजपच्या एका पदाधिकाऱ्याचा ऑडिओ व्हायरल झाला असून त्यानेही याची कबुली दिली आहे.
भाजपाचे 'बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ'चे महानगर सह संयोजक कुलदीप शर्मा यांचा तो ऑडिओ आहे. धक्कादायक म्हणजे व्ही. के. सिंग यांना पाडण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी संजीव शर्मा आणि त्यांचे जवळचे पप्पू पहेलवान सूत्रधार असल्याचे कुलदीप यांनी सांगितल्याने भाजपामध्ये खळबळ माजली आहे. स्वीकृत सदस्य बनविण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून ही क्लीप व्हायरल करण्यात आली आहे. दुसरीकडे संजीव शर्मा यांनी हे महानगर अध्यक्ष मानसिंह गोस्वामी यांचे कारस्थान असल्याचे सांगत आरोप फेटाळले आहेत.
या ऑडिओमध्ये दोघांमध्ये चर्चा होत आहे. यामध्ये भाजपामध्ये घुसखोरी, स्वीकृत सदस्य बनविण्यासाठी पैसे वसुली आणि भाजपाचे उमेदवार सिंग यांना पाडल्यानंतर पार्टी करण्याचे बोलले गेले आहे. समोरच्या बाजुला भाजयुमोचे माजी अध्यक्ष अजय त्यागी आहेत.
कुलदीप यांच्या दाव्यानुसार संजीव शर्मा आणि पप्पू यांनी कुलदीपना स्वीकृत सदस्य बनविण्यासाठी चर्चा केली होती. यावेळी काही पैसे खर्च करावे लागतील असेही सांगण्यात आले होते. मात्र, यासाठी फ्लॅटची नोंदणी न झाल्याने चर्चा फिस्कटली होती. यामुळे व्ही. के सिंग यांचे प्रतिनिधी संजीव यांनी कारस्थान रचत कुलदीप याच्याशी चर्चा करायला लावली आणि ऑडिओ व्हायरल केला आहे.