द्वेष व अहंकाराचा पराभव - ममता बॅनर्जी
By admin | Published: February 10, 2015 12:10 PM2015-02-10T12:10:57+5:302015-02-10T12:11:06+5:30
दिल्लीतील निवडणुकीत जनतेचा विजय झाला असून द्वेष, हिंसा व अहंकाराचा पराभव झाला आहे अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - दिल्लीतील निवडणुकीत जनतेचा विजय झाला असून द्वेष, हिंसा व अहंकाराचा पराभव झाला आहे अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. तर भाजपाच्या काळात फक्त उद्योजकांचेच अच्छे दिन आल्याने आपचा विजय झाला असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.
दिल्लीत आम आदमी पक्षाला मिळालेल्या विजयानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी अरविंद केजरीवाल यांचे कौतुक करत मोदींवरही निशाणा साधला. 'दिल्लीतील निकाल हा भारताच्या राजकारणातील महत्त्वाचे वळण ठरणार असून भारताला अशा प्रकारच्या परिवर्तनाची गरज होते असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. केजरीवाल व त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन करतानाच ममता दिदींनी मोदींवर अप्रत्यक्ष टीका केली. 'हा जनतेचा विजय असून अहंकार, सूडाचे राजकारण आणि द्वेष पसरवणा-यांचा पराभव आहे' असेही त्यांनी नमूद केले.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही अऱविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे. हजारे म्हणाले, केजरीवाल यांनी जनलोकपाल विधेयकाची लढाई विसरु नये व हे विधेयक पुढे न्यावे. भाजपाची विश्वासार्हता कमी झाली असून मोदी सरकारच्या काळात जनतेला अच्छे दिनाची प्रतिक्षा होती. मात्र प्रत्यक्षात फक्त उद्योजकांसाठीच अच्छे दिन आले असा टोलाही त्यांनी लगावला. भाजपाचे भ्रष्टाचारावर नियंत्रण नाही असेही त्यांनी नमूद केले. केजरीवाल यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार नाही असे हजारे यांनी स्पष्ट केले.