मैतेई-कुकी समाजाला राजनाथ सिंहांचं आवाहन; म्हणाले, "एकत्र बसावं अन् मनापासून..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 05:33 PM2023-11-01T17:33:45+5:302023-11-01T17:36:33+5:30
राजनाथ सिंह यांनी लोकांना सांगितले की, हिंसाचार हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही आणि मणिपूरमधील दोन्ही समुदायांनी संकटग्रस्त राज्यातील परिस्थिती सुधारण्यासाठी एकमेकांशी बोलले पाहिजे.
मिझोराम : मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून विविध ठिकाणी हिंसाचार सुरुच आहे. याच पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी येथील मैतेई आणि कुकी समाजाला महत्वाचे आवाहन केले आहे. मैतेई आणि कुकी समाजाला एकत्र बसून मनापासून बोलण्याचे आवाहन केले. बुधवारी राजनाथ सिंह यांनी म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या दक्षिण भागात एका रॅलीला संबोधित केले.
यादरम्यान राजनाथ सिंह यांनी लोकांना सांगितले की, हिंसाचार हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही आणि मणिपूरमधील दोन्ही समुदायांनी संकटग्रस्त राज्यातील परिस्थिती सुधारण्यासाठी एकमेकांशी बोलले पाहिजे. गेल्या नऊ वर्षांत ईशान्य भागात शांतता आहे. मात्र, आम्ही मणिपूरमध्ये हिंसाचार पाहिला आहे आणि तो आमच्यासाठी वेदनादायक आहे. याचबरोबर, हिंसा हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही. आपल्याला मनापासून बोलण्याची गरज आहे. मैतेई आणि कुकी समाजाने एकत्र बसावे आणि थेट मनापासून एकमेकांशी संवाद साधावा आणि परस्परांमधील अविश्वासाचे वातावरण संपवावे, असे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले आहे.
Public Meeting in Mamit, Mizoram
— Rajnath Singh (@rajnathsingh) November 1, 2023
https://t.co/nGvpQDNVCq
दरम्यान, मणिपूरमध्ये ३ मे रोजी जातीय हिंसाचार उसळला होता. मणिपूरमध्ये बहुसंख्य मैतेई आणि अल्पसंख्याक कुकी जमातींमध्ये हा जातीय हिंसाचार झाला होता. गेले काही महिने दोन्ही समाजामध्ये जोरदार संघर्ष सुरू होता. यावेळी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. तसेच, घरांची मोठ्याप्रमाणात जाळपोळ झाली होती. या हिंसाचारानंतर जवळपास १७५ लोकांचा मृत्यू झाला. तसेच, या हिंसाचारात शेकडो लोक जखमी झाले.
१९६६ च्या घटनेचा उल्लेख
केंद्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारने १९६६ मध्ये मिझोराममध्ये हवाई दलाचा वापर केल्याचाही संरक्षणमंत्र्यांनी उल्लेख केला. १९६६ च्या घटनेचा संदर्भ देत ते म्हणाले, "केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी मिझोरामवर देशातील पहिला हवाई हल्ला केला होता. आता भाजप सत्तेत असून आम्ही असे प्रकार कधीच करणार नाही."
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची हत्या
मंगळवारी सकाळी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सीमाभागातील या शहरात हिंसाचारावर नियंत्रणासाठी मणिपूर पोलिसांच्या कमांडोंना पाचारण करण्यात आले होते. या कमांडोंच्या टीमच्या मार्गात स्फोट घडवून आणण्यात आला. यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत.