गोव्यात आजपासून डिफेन्स एक्स्पो
By admin | Published: March 28, 2016 12:36 AM2016-03-28T00:36:17+5:302016-03-28T00:36:17+5:30
संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने २८ ते ३१ मार्चदरम्यान आयोजित केलेल्या नवव्या डिफेन्स एक्स्पोचे बेतूल येथे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांंच्या हस्ते सोमवारी
पणजी : संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने २८ ते ३१ मार्चदरम्यान आयोजित केलेल्या नवव्या डिफेन्स एक्स्पोचे बेतूल येथे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांंच्या हस्ते सोमवारी उद्घाटन होणार आहे. देशी-विदेशी कंपन्यांचा वाढता सहभाग, तब्बल ४७ देशांचे प्रतिनिधित्व यामुळे यंदाचा डिफेन्स एक्स्पो सर्वार्थाने देशातील मोठा एक्स्पो ठरणार आहे.
१ हजार देशी-विदेशी कंपन्या यात भाग घेणार आहेत. २०१४ च्या एक्स्पोच्या तुलनेत ही संख्या दीडपटीने जास्त आहे. देशी कंपन्यांचा सहभाग दुपटीने वाढला आहे. २०१४ मध्ये २५६ देशी कंपन्यांनी भाग घेतला होता. या वेळी ही संख्या ५१० वर पोचली आहे. तसेच ४९० विदेशी कंपन्या भाग घेणार आहेत. २०१४ च्या डिफेन्स एक्स्पोमध्ये विदेशी कंपन्यांचा आकडा ३६८ होता.
या निमित्ताने होणाऱ्या कार्यशाळांमुळे संरक्षण क्षेत्रातील विकास व संधी याला वाव मिळेल. २९ व ३0 रोजी अद्ययावत जहाज बांधणी तंत्रज्ञान, संरक्षण क्षेत्रासाठी ‘मेक इन इंडिया’, भारत आणि कोरिया संरक्षण सहकार्य, भारतीय लष्करासमोरील आव्हाने व संधी या विषयांवर परिसंवाद होणार आहेत. (प्रतिनिधी)
२०४ शासकीय शिष्टमंडळे होणार सहभागी
९५० प्रतिनिधी या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. ४७ देशांची २०४ शासकीय शिष्टमंडळे आणि ७५0 बिगर शासकीय शिष्टमंडळे भाग घेतील.
गेल्यावेळी डिफेन्स एक्स्पोमध्ये ३० देश सहभागी झाले होते. या वेळी ४७ देश सहभागी होणार असून यात आॅस्ट्रेलिया, बेलारुस, आॅस्ट्रिया, बेल्जियम, ब्राझिल, कॅनडा, क्रोएशिया, सायप्रस, झेक रिपब्लिक, इजिप्त, फ्रान्स, जर्मनी, हाँगकाँग, हंगेरी, इस्रायल, इटली, जपान, मलेशिया, नेदरलँड, न्यूझीलंड, नायजेरिया, पोर्तुगाल, रोमानिया, रशिया, दक्षिण आफ्रिका, स्पेन, तैवान, इंग्लंड, अमेरिका आदी देशांचा समावेश आहे.
संरक्षण साहित्य खरेदीचे धोरण आॅनलाइन
डिफेन्स एक्स्पोमध्ये संरक्षण साहित्य खरेदीबाबतचे धोरण आॅनलाइन जाहीर केले जाईल. संरक्षण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर ते उपलब्ध होईल, अशी माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली. श्रीलंकेचे संरक्षणमंत्री रुवान विजेवर्धने यांनी वास्कोतील गोवा शिपयार्डला रविवारी भेट देऊन तिथे सुरू असलेल्या श्रीलंकन गस्तीनौकेच्या बांधणीची पाहणी केली. म्यानमार, श्रीलंका, मॉरिशसच्या नौका बांधणीचे सुमारे १,२०० कोटींची काम गोवा शिपयार्डला मिळाले आहे.