संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण भारताच्या शक्तिशाली फायटर विमानातून अनुभवणार उड्डाणाचा थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 07:15 PM2018-01-15T19:15:55+5:302018-01-15T19:22:15+5:30
भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण येत्या 17 जानेवारीला सुखोई 30 मार्क वन या लढाऊ विमानातून उड्डाण करणार आहेत. इंडियन एअर फोर्सच्या जोधपूर बेसवरुन त्या सुखोईमधून उड्डाणाचा अनुभव घेणार आहेत.
नवी दिल्ली - भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण येत्या 17 जानेवारीला सुखोई 30 मार्क वन या लढाऊ विमानातून उड्डाण करणार आहेत. इंडियन एअर फोर्सच्या जोधपूर बेसवरुन त्या सुखोईमधून उड्डाणाचा अनुभव घेणार आहेत. सुखोई 30 मार्क वन हे भारतीय हवाई दलाचे सर्वात शक्तिशाली लढाऊ विमान आहे. या उड्डाणातून त्या सुखोई विमानाची क्षमता आणि तयारीचा आढावा घेणार आहेत.
निर्मला सीतारमण यांच्याआधी भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी 2009 साली सुखोई 30 मार्क वनमधून उड्डाणाचा अनुभव घेतला होता. सुखोईमधून उड्डाण करणा-या त्या भारताच्या पहिल्या राष्ट्रप्रमुख आहेत. वयाच्या 74 व्या वर्षी फायटर जेटमधून उड्डाण करुन त्यांनी विश्वविक्रम रचला होता. जवळपास 30 मिनिट त्यांनी सुखोईमधून सफर केली होती. पुण्याच्या लोहगाव विमानतळावरुन त्यांच्या सुखोईने भरारी घेतली होती. सुखोई हे भारताचे चौथ्या पिढीचे अत्याधुनिक लढाऊ विमान आहे. तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या झालेल्या करारानुसार रशियन बनावटीची ही विमाने आता भारतात बनवण्यात येतात.
Defense Minister Nirmala Sitharaman will fly a sortie in the Sukhoi 30 MKI fighter aircraft on 17th Jan at Air Force Station in Jodhpur to gauge & review the operational preparedness & combat capabilities of the armed forces
— ANI (@ANI) January 15, 2018
सुखोईमधून सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात भारताने सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्राची सुखोई फायटर जेट विमानातून घेतलेली चाचणी यशस्वी ठरली होती. आवाजाच्या वेगापेक्षा सुमारे तिप्पट वेगाने हल्ला करण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये आहे. सुखोई-30एमकेआय हे भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील अत्याधुनिक लढाऊ विमान आहे. ब्राह्मोसची सुखोईवरुन घेण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरल्यामुळे भारतीय हवाई दलाची शत्रू प्रदेशात खोलवर हल्ला करण्याची क्षमता वाढणार आहे.
ब्राह्मोस हे वर्ल्डक्लास क्षेपणास्त्र आहे. भारताकडे आता जमीन, समुद्र आणि हवेतून हे क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता प्राप्त झाली आहे. अचूकता आणि वेग हे ब्राह्मोसचे वैशिष्टय आहे. सुखोईमधून ब्राह्मोस डागल्यानंतर या क्षेपणास्त्राने बंगालच्या सागरातील आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला. ब्राह्मोस आणि सुखोई हे कॉम्बिनेशन सर्वात खतरनाक असून शत्रू सैन्यासाठी धोक्याची घंटा आहे.
जगातील हे एक वेगवान क्रूझ मिसाईल आहे. ही चाचणी यशस्वी झाल्याबद्दल संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी डीआरडीओच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले होते. रशियाचे एनपीओएम आणि भारताचे डीआरडीओ या दोघांनी मिळून संयुक्तपणे ब्राह्मोसची निर्मिती केली आहे. चाचणी यशस्वी झाल्यामुळे आता आणखी 42 सुखोई विमानेही ब्राह्मोसने सुसज्ज करण्यात येणार आहेत.