काहीही न करताना पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 02:15 PM2023-06-26T14:15:12+5:302023-06-26T14:16:01+5:30
'पाकिस्तानात सध्या स्थिती वाईट आहे, त्यामुळे पीओकेत भारतात सामील होण्याची मागणी होत आहे.'
Rajnath Singh on PoK: भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. आता सोमवारी(दि.26) त्यांनी पाकव्याप्त काश्मीर (POK) संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. जम्मूमध्ये राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित एका परिषदेत बोलताना ते म्हणाले की, 'आता पीओके भारतात विलीन करण्याची मागणी होत आहे, तिथे आम्हाला फार काही करण्याची गरज नाही.' यावेळी संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तानवर दहशतवादाच्या मुद्द्यावरुन टीकाही केली.
पीओकेबाबतराजनाथ सिंह म्हणाले की, तेथील लोक सतत भारतात सामील होण्याची मागणी करत आहेत, अशा परिस्थितीत आम्हाला फार काही करण्याची गरज नाही. जम्मूमध्ये बोलताना संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तान आणि चीनबाबत वक्तव्य केले. आमच्या सैन्याने एलएसीवर चीनला चोख प्रत्युत्तर दिल्याचे ते म्हणाले.पाकिस्तानच्या भूमीवरून पसरलेल्या दहशतवादाबद्दल राजनाथ सिंह म्हणाले की, 2019 मध्ये पुलवामा हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान मोदींनी दहा मिनिटांत कारवाईचा निर्णय घेतला.
Delivering a keynote address on ‘India’s National Security’ in Jammu.
— Rajnath Singh (@rajnathsingh) June 26, 2023
https://t.co/uBqbc3iKOd
भारतीय लष्कराने सीमेपलीकडे जाऊन दहशतवाद्यांचा खात्मा केला. गरज पडल्यास सीमेपलीकडे जाऊनही भारत शत्रूंचा नायनाट करू शकतो, असे राजनाथ यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपासून पाकिस्तानची स्थिती चांगली नाही, राजकीय आघाडीवर पाकिस्तानची स्थिती अतिशय वाईट आहे. पीओकेमध्ये वेळोवेळी पाकिस्तानी राजवटीच्या विरोधात निदर्शने होत असतात. यामुळेच भारत सरकार पीओकेच्यावर लक्ष ठेवून आहे, असेही ते म्हणाले.