संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी चीनला फटकारलं; लडाख सीमेवरील संपूर्ण स्थिती लोकसभेत मांडली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 03:54 PM2020-09-15T15:54:29+5:302020-09-15T15:57:07+5:30

संपूर्ण देश सैनिकांच्या पाठीशी उभा आहे असा ठराव आपण पारित केला पाहिजे असंही राजनाथ सिंह म्हणाले.

Defense Minister Rajnath Singh present entire situation on India China Border in the Lok Sabha | संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी चीनला फटकारलं; लडाख सीमेवरील संपूर्ण स्थिती लोकसभेत मांडली

संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी चीनला फटकारलं; लडाख सीमेवरील संपूर्ण स्थिती लोकसभेत मांडली

googlenewsNext
ठळक मुद्देआम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास तयार आहोतभारताची अखंडता आणि सार्वभौमत्व जपण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध सीमा सुरक्षित आहे आणि आपले सैनिक मातृभूमीच्या रक्षणासाठी तैनात

नवी दिल्ली – भारत चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लोकसभेत निवदेन सादर करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखला जाऊन सैनिकांची भेट घेतली. देश शूर सैनिकांच्या मागे उभा आहे असा संदेशही त्यांनी दिला होता. मीसुद्धा लडाखला गेलो, सैनिकांचे धैर्य, शौर्य आणि धाडस याचा प्रत्यय आला. कर्नल संतोषने मातृभूमीचे रक्षण करताना सर्वोच्च बलिदान दिले असंही ते म्हणाले.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, पारंपारिक सीमेबद्दल दोन्ही देशांचे वेगवेगळे अर्थ आहेत असा चीनचा दावा आहे. १९५०-६० च्या दशकात हे दोन्ही देश याबद्दल बोलत होते पण कोणताही तोडगा निघाला नाही. चीनने लडाखमधील काही जमीन फार पूर्वी ताब्यात घेतली होती, त्याव्यतिरिक्त पाकिस्तानने पीओकेमधील काही जमीनही चीनच्या ताब्यात दिली. ही एक मोठी समस्या आहे आणि त्याचे निराकरण शांततेने व वाटाघाटीने करायला हवे. सीमेवर शांतता राखणे महत्वाचे आहे. सध्या एलएसीसंदर्भात दोन्ही देशांचे वेगळे मत आहे. शांतता कायम ठेवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये करार झाले आहेत. १९८८ पासून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधात विकास झाला. द्विपक्षीय संबंधही विकसित होऊ शकतात आणि सीमादेखील तोडगा निघू शकतो, असा विश्वास भारताला आहे. तथापि, त्याचा द्विपक्षीय संबंधांवरही परिणाम होऊ शकतो असं ते म्हणाले.



 

तसेच करारामध्ये असे सांगितले गेले आहे की, सीमेचे पूर्ण निराकरण होईपर्यंत एलएसीचे उल्लंघन केले जाणार नाही. १९९० ते २००३ या काळात दोन्ही देशांमध्ये एकमत होण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु त्यानंतर चीन या दिशेने पुढे आला नाही. एप्रिल महिन्यापासून लडाखच्या सीमेवर चिनी सैन्य आणि शस्त्रास्त्रांमध्ये वाढ झालेली दिसली. चिनी सैन्याने आमच्या पेट्रोलिंगमध्ये अडथळा आणला, त्या कारणामुळे ही स्थिती निर्माण झाली. आमच्या धाडसी सैनिकांनी चिनी सैन्याचे मोठे नुकसान केले आहे आणि सीमेचे रक्षणही केले आहे. देशाच्या सैनिकांनी पराक्रमाची आवश्यकता असलेल्या ठिकाणी शौर्य दाखवले आणि शांतता आवश्यक तेथे शांतता ठेवली असं राजनाथ सिंह यांनी सांगितले.


चीनचा घुसखोरी करण्याचा प्रयत्न

दोन्ही देशांनी जैसे थे स्थिती कायम ठेवली पाहिजे आणि शांतता व सौहार्द सुनिश्चित केला पाहिजे. चीनसुद्धा हे म्हणतोय. पण तरीही २९-३० ऑगस्टच्या रात्री चीनने पुन्हा पेंगॉंगमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला पण आपल्या सैनिकांमुळे त्यांचा डाव फसला. सीमा सुरक्षित आहे आणि आपले सैनिक मातृभूमीच्या रक्षणासाठी तैनात आहेत असा विश्वास सभागृहाला देतो. सशस्त्र सेना आणि आयटीबीपी वेगाने तैनात करण्यात आले आहेत. गेल्या अनेक दशकांत चीनने पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू केली आहेत. त्याला उत्तर म्हणून सरकारने सीमा क्षेत्रातील विकासासाठी अर्थसंकल्पातही वाढ केली आहे असं राजनाथ सिंह म्हणाले.


भारताच्या अखंडतेसाठी कटिबद्ध

आता सीमाभागातील सैनिक अधिक सतर्क राहू शकतात आणि गरज पडल्यास कारवाई करू शकतात. आपल्या सीमाभागातील वाद शांततेने सोडविण्यासाठी भारत कटिबद्ध आहे. मी ही परिस्थिती चीनच्या संरक्षणमंत्र्यांसमोर ४ तारखेला ठेवली. आम्हाला हा प्रश्न शांततेने सोडवायचा आहे. भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व जपण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत असं स्पष्ट शब्दात त्यांना सांगितलं अशी माहिती राजनाथ सिंह यांनी सभागृहाला दिली.

संपूर्ण देश सैनिकांच्या पाठिशी उभा आहे असा ठराव करुया

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी चिनी परराष्ट्र मंत्र्यांना असेही सांगितले की जर करारांवर सहमती झाली तर शांतता पूर्ववत होऊ शकते. आम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास तयार आहोत हेही सभागृहात स्पष्ट करुन सांगायचे आहे. देशाच्या सैनिकांचा उत्साह आणि धैर्य मजबूत आहे. पंतप्रधानांनी सैनिकांची भेट घेतल्यानंतर हा संदेश गेला आहे की सर्व लोक त्यांच्या पाठीशी उभे आहेत. लडाखमध्ये आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहोत. संपूर्ण देश सैनिकांच्या पाठीशी उभा आहे असा ठराव आपण पारित केला पाहिजे असंही राजनाथ सिंह म्हणाले.



 

Web Title: Defense Minister Rajnath Singh present entire situation on India China Border in the Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.