एनडीएतून शिवसेना बाहेर पडण्यावर राजनाथ सिंह म्हणाले,"काही पक्ष जातात, तर काही..."
By जयदीप दाभोळकर | Published: January 17, 2021 08:24 AM2021-01-17T08:24:40+5:302021-01-17T08:32:06+5:30
शिवसेना आणि अकाली शिरोमणी दलानं एनडीएतून बाहेर पडण्याचा घेतला होता निर्णय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं. एका कार्यक्रमादरम्यान विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. याव्यतिरिक्त राजनाथ सिंह यांनी शेतकरी आंदोलन, सीमांचं संरक्षण, कोरोना लसीकरणासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिवसेना आणि शिरोमणी अकाली दलाच्या एनडीएतून बाहेर पडण्यावरही आपलं मत व्यक्त केलं.
योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांची कामगिरी ए वन असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले. आतापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांपेक्षा योगी आदित्यनाथ यांची कामगिरी उत्तम वाटते का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. "मी कोणाचीही तुलना करू इच्छीत नाही. परंतु मी योगी आदित्यनाथ यांना माझ्यापेक्षा उत्तम मुख्यमंत्री मानतो," असं सिंह म्हणाले. आजतक या वाहिनीच्या 'सीधी बात' या कार्यक्रमात ते सहभागी झाली होते. या कार्यक्रमात त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली.
"योगी आदित्यनाथ हे प्रत्येकाच्या विकासासाठी काम करत आहेत. त्यांनी आपलं जीवन जनतेसाठी समर्पित केलंय. त्यांची उत्तर प्रदेशातील कामगिरी उत्तमच आहे," असंही ते म्हणाले. यावेळी त्यांना पश्चिम बंगालच्या निवडणुकांबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी भाजपाला निवडणुकीत विजय मिळे, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांना शिवसेना आणि शिरोमणी अकाली दलासारख्या जुन्या सहकारी पक्षांच्या एनडीएतून बाहेर पडण्यावरही प्रश्न विचारण्यात आला. "काही नवे पक्ष येतात काही जातात. जर कोणत्या पक्षाला आपल्या युती धर्माचं पालन करता येतं तर तो भाजपा आहे," असा दावाही त्यांनी प्रश्नाचं उत्तर देताना केला.
देशातील जनतेला विश्वास
यावेळी जनतेच्या मनात विश्वास वाढवण्यासाठी इतर देशातील नेत्यांप्रमाणेच आपल्या देशातही नेत्यांनी लस घेतली पाहिजे होती का, अशा प्रश्न राजनाथ सिंह यांना विचारण्यात आला. "इतर देशातील लोकांप्रमाणे आपल्या देशातील जनता विचार करेल असं मला वाटत नाही. कारण कोरोनावरील लसीची अंतिम चाचणी झाली आहे. देशातील शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनी ही चाचणी घेतली आहे. मला वाटते की देशातील जनतेचा या लोकांवर विश्वास आहे. तसेच आम्हीही जनतेला विश्वास देत आहोत. दरम्यान, कोविड-१९ च्या आव्हानाचा देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या प्रकारे केला, त्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे," असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.