समुद्रात भारताची ताकद आणखी वाढणार, आधुनिक युद्धनौकांसाठी लवकरच मिळणार मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 05:22 PM2024-07-19T17:22:08+5:302024-07-19T17:25:22+5:30

defense ministry : संरक्षण मंत्रालय नौदलाला एकापेक्षा एक आधुनिक युद्धनौका पुरवत आहे, जेणेकरून ते शत्रूचा सामना करू शकतील.

defense ministry will spend seventy thousand crores for hitech warships      | समुद्रात भारताची ताकद आणखी वाढणार, आधुनिक युद्धनौकांसाठी लवकरच मिळणार मंजुरी

समुद्रात भारताची ताकद आणखी वाढणार, आधुनिक युद्धनौकांसाठी लवकरच मिळणार मंजुरी

नवी दिल्ली : समुद्रात भारताची ताकद आणखी वाढणार आहे. भारतीय नौदलाला लवकरच आणखी हायटेक युद्धनौका मिळू शकतात. भारतीय नौदलाला बळकट करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत नवीन युद्धनौका बांधण्यासाठी लवकरच 70 हजार कोटी रुपयांच्या कराराला मंजुरी देण्याची शक्यता आहे.

संरक्षण मंत्रालय भारतीय नौदलासाठी नवीन युद्धनौका बांधण्यासाठी 70 हजार कोटी रुपयांचे मोठे कंत्राट देणार आहे. अत्याधुनिक स्टील्थ फ्रिगेट भारतात बांधली जाणारी सर्वात तांत्रिकदृष्ट्या प्रगत जहाजे असणार आहेत. सध्या नौदलासाठी निलगिरी क्लासची जहाजे बांधली जात आहेत. 

ही सिरिज पुढे नेत या आधुनिक युद्धनौकाही बांधल्या जाणार आहेत. स्टील्थ फ्रिगेटमध्ये स्वदेशी उपकरणे बसवली जातील, ज्यात स्थानिक पातळीवर डिझाइन केलेली नियंत्रण प्रणाली, ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्र, पाणबुडीविरोधी शस्त्रे आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली यांचा समावेश आहे.

संरक्षण मंत्रालयाकडून प्रोजेक्ट 17B अंतर्गत दोन शिपयार्ड्सना कंत्राट दिले जाऊ शकते. जेणेकरून जहाजे लवकरात लवकर भारतीय नौदलात सामील करता येतील. मंत्रालयाच्या या ऑर्डरचा फायदा अनेक लहान पुरवठादार आणि विक्रेत्यांना होणार आहे, कारण ते देखील या कामाचा एक भाग असतील. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रोजेक्ट 17B अंतर्गत युद्धनौका बांधण्याचे कंत्राट मिळवण्यासाठी दोन सरकारी मालकीच्या शिपयार्ड्स आघाडीवर आहेत. यापैकी एक माझगाव डॉकयार्ड्स लिमिटेड (MDL) आणि दुसरी गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स (GRSI) आहे.

माझगाव डॉकयार्ड्स लिमिटेड ही भारतातील सर्वात प्रगत शिपयार्ड्सपैकी एक म्हणून गणली जाते. या करारामुळे कंपनीची ऑर्डर बुकिंगही वाढणार आहे. सध्या मुंबईतील या शिपयार्डमध्ये कलावरी क्लासच्या पाणबुड्या आणि प्रोजेक्ट 17A क्लास फ्रिगेट्सची बांधणी सुरू आहे. 

गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स सध्या नेक्स्ट जनरेशनची गस्ती जहाजे आणि पाणबुडीविरोधी युद्ध कॉर्वेट्स तयार करत आहे. दरम्यान, भारतीय नौदलाला हायटेक युद्धनौका मिळाल्यानंतर त्यांची समुद्रातील ताकद वाढणार आहे. संरक्षण मंत्रालय नौदलाला एकापेक्षा एक आधुनिक युद्धनौका पुरवत आहे, जेणेकरून ते शत्रूचा सामना करू शकतील.
 

Web Title: defense ministry will spend seventy thousand crores for hitech warships     

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.