केंद्रीय विद्यापीठात आता पदवी प्रवेश सीईटीद्वारेच; देशातील सर्व ४५ शिक्षण संस्थांचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 06:27 AM2022-03-22T06:27:25+5:302022-03-22T06:27:43+5:30
बारावी परीक्षेतील गुणांना नसेल महत्त्व
नवी दिल्ली : देशातील सर्व ४५ केंद्रीय विद्यापीठांच्या पदवी वर्गांतील प्रवेशासाठी पहिल्यांदा केंद्रिकृत परीक्षा (सीईटी) होईल. त्यासाठी बारावी परीक्षेत मिळालेल्या गुणांचे काही महत्त्व नसेल आणि प्रवेश फक्त सीईटीच्या गुणांवर मिळेल.
एप्रिल महिन्यात सीईटीची अधिसूचना नॅशनल टेस्टिंग एजन्सी जारी करील आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा १३ भारतीय भाषांमध्ये होईल. जर कोणी विदेशी विद्यार्थी केंद्रीय विद्यापीठांत विदेशी भाषा किंवा साहित्य शिकू इच्छित असेल तर त्यासाठी १९ विदेशी भाषांचा पर्यायही असेल. याशिवाय पदवी अभ्यासक्रमासाठी २७ विषयांच्या निवडीचा पर्याय असेल. त्यातून विद्यार्थी कमीतकमी एक आणि जास्तीत जास्त सहा विषयांची निवड करू शकेल. राज्य सरकारांची विद्यापीठे आणि अभिमत विद्यापीठांतील प्रवेशासाठीही सीईटीची अनिवार्यता नसेल. परंतु, जर त्यांना हवे असेल तर सीईटीच्या गुणांच्या आधारावर प्रवेश देऊ शकतील. दिल्लीस्थित जामिया मिलिया इस्लामिया आणि सेंट स्टिफेंस महाविद्यालयाशिवाय अलीगढ मुस्लिम विद्यापीठसारख्या अल्पसंख्याक शिक्षण संस्थांमध्येही प्रवेश सीईटीद्वारेच दिला जाईल.
पीजीसाठीही सीईटी
यावर्षी एनटीए पदव्युत्तर वर्गांतील प्रवेशासाठीही सीईटी आयोजित करील. परंतु, केंद्रीय विद्यापीठांना त्यांच्या गुणांच्या आधारे प्रवेश घेण्याची सक्ती नसेल.
ते पदवी परीक्षेतील गुणांच्या आधारावर किंवा स्वत: आपली प्रवेश परीक्षा आयोजित करून प्रवेश देऊ शकतील. परंतु, शक्यता अशी की येत्या काही वर्षांत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीही सीईटीद्वारेच प्रवेश मिळेल.
गेल्या वर्षीही सीईटीचे आयोजन केले गेले होते. परंतु, तेव्हा केंद्रीय विद्यापीठांत त्या आधारावरच प्रवेश देण्याची सक्ती नव्हती.
तेव्हा फक्त १२ विद्यापीठेच या योजनेत सहभागी झाले होते. यावेळी सर्व ४५ केंद्रीय विद्यापीठांसाठी सीईटी अनिवार्य केली गेली आहे.