रुग्णाला मिळत नव्हता 'ब्लड डोनर', डॉक्टरनं स्वत: केलं डोनेट; सोशल मीडियात कौतुकाचा वर्षाव!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 09:26 AM2022-11-24T09:26:14+5:302022-11-24T09:37:59+5:30
डेहरादूनमधील एका डॉक्टरांनी केलेल्या कृतीचं सोशल मीडियात खूप कौतुक केलं जात आहे.
डेहरादून-
डेहरादूनमधील एका डॉक्टरांनी केलेल्या कृतीचं सोशल मीडियात खूप कौतुक केलं जात आहे. रुग्णाला ऐनवेळी कुणीच ब्लड डोनर मिळत नव्हता. मग स्वत: डॉक्टर धावून आले आणि त्यांनी ब्लड डोनेट करण्याचा निर्णय घेत रुग्णाला जीवदान दिलं. डॉक्टरांच्या या कृतीचं खूप कौतुक केलं जात आहे.
सरकारी रुग्णालय प्रशासनाला अनेकदा अपुऱ्या सुविधांमुळे किंवा गैरवर्तणुकीमुळे टीकेला सामोरं जावं लागतं. यातच एका सरकारी डॉक्टरनं माणुसकीचं दर्शन घडवत सर्वांचं मन जिंकलं आहे. रुग्णाच्या शस्त्रक्रियेआधी त्याच्यासाठी रक्तदान करणाऱ्या या ऑर्थोपेडिक डॉक्टरचं सोशल मीडियात खूप कौतुक केलं जात आहे.
एक व्यक्ती भल्या मोठ्या खड्ड्यात पडल्यानं गंभीर जखमी झाला होता. त्याच्या बरगड्या, उजवा हात आणि मांडीची हाडं फ्रॅक्चर झाली. उपचारासाठी त्याला पीजी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केलं गेलं होतं. तीन दिवसांपासून रुग्ण आयसीयूमध्ये होता. त्यानंतर डॉक्टरांनी रुग्णाच्या मांडीची शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचं नातेवाईकांना सांगितलं. पण रक्ताच्या कमतरतेमुळे शस्त्रक्रिया करता येत नव्हती. रुग्णाची मुलगी रक्तदान करण्यासाठी पुढे आली. पण प्रकृती अस्वास्थामुळे मुलीलाही रक्तदान करता येईना. मग ब्लड डोनेट करण्यासाठी कुणीच पुढे येत नसल्याचं पाहून ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. शशांक सिंह यांनीच रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. डॉ. शशांक यांच्या याच कृतीचं खूप कौतुक केलं जात आहे.