मायावतींना अपमानित करणारे दयाशंकर सिंह पुन्हा भाजपात
By admin | Published: March 13, 2017 12:47 AM2017-03-13T00:47:28+5:302017-03-13T00:47:28+5:30
बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केलेले दयाशंकर सिंह यांचे निलंबन भाजपने रविवारी मागे घेतले
लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केलेले दयाशंकर सिंह यांचे निलंबन भाजपने
रविवारी मागे घेतले. दयाशंकर सिंह यांची पत्नी व भाजपच्या महिला शाखेच्या प्रमुख स्वाती सिंह या येथील सरोजिनी नगर मतदार संघातून भाजपच्या तिकिटावर विधानसभेत निवडून आल्यानंतर पक्षाने हा निर्णय घेतला.
दयाशंकर यांचे निलंबन उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांनी मागे घेतले आहे, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते हरीश चंद्र श्रीवास्तव यांनी रविवारी येथे दिली. मायावती यांच्याबद्दल दयाशंकर सिंह यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर गेल्या वर्षी २० जुलै रोजी त्यांच्याविरोधात दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता.
बसपाने केली होती तक्रार
मवू येथे २० जुलै २०१६ रोजी दयाशंकर सिंह यांनी मायावती यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे बसपचे कार्यकर्ते आणि देशातील दलित समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या व त्यांना चिथावण्याचा प्रयत्न झाला अशी तक्रार बसपचे राष्ट्रीय चिटणीस मेवालाल गौतम यांनी पोलिसांकडे केली होती. नंतर हा विषय मायावती यांनी लोकसभेत उपस्थित केल्यावर भाजपने दयाशंकर सिंह यांना निलंबित केले. दयाशंकर सिंह हे वक्तव्य केले त्यावेळी उत्तर प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष होते.