दोन कोटीच्या नोटा आणि 4 किलो सोन्याने मढवून केली देवीची आरास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 12:28 PM2019-10-07T12:28:38+5:302019-10-07T12:29:19+5:30
नवरात्रौत्सवानिमित्त अनेक ठिकाणी देवीच्या आराशीसाठी भव्य मंडप आणि नयनरम्य देखावे उभारण्यात आले आहेत. दरम्यान, आंध्र प्रदेशमधील असाच एक मंडप सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
विशाखापट्टणम - सध्या देशभरात नवरात्रौत्सव उत्साहात साजरा होत आहे. ठिकठिकाणी देवीच्या प्रतिमांची प्रतिष्ठापना करून तिची भक्तिभावाने सेवा केली जात आहे. अनेक ठिकाणी देवीच्या आराशीसाठी भव्य मंडप आणि नयनरम्य देखावे उभारण्यात आले आहेत. दरम्यान, आंध्र प्रदेशमधील असाच एक मंडप सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणममधील देवीच्या मूर्तीची आरास सध्या चर्चेत आहे. या मूर्तीची आरास करण्यासाठी तब्बल चार किलो सोने आणि दोन कोटी रूपयांच्या नोटांचा वापर करण्यात आला आहे. ही वैशिष्ट्यपूर्ण आरास पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील श्री कन्यका परमेश्वरी मंदिरात दुर्गाष्टमीनिमित्त देवीची मूर्ती आणि मंदिरातील गाभाऱ्याची सजावट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही सजावट करण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांच्या चलनी नोटांचा वापर करण्यात आला आहे. तसेच या सजावटीसाठी सुमारे चार किलो सोन्याचाही वापर कण्यात आला आहे. नोटांची माळ बनवून ती मूर्तीच्या चारी बाजूंनी फिरवण्यात आली आहे.
#WATCH Deity goddess and temple interiors decorated with 4 kg gold and currency notes worth approximately Rs 2 crores at Sri Kanyaka Parameswari Temple in Visakhapatnam. #AndhraPradeshpic.twitter.com/JHxry6DLMV
— ANI (@ANI) October 6, 2019
हे मंदिर सुमारे 140 वर्षे जुने असून, देवी अम्मावारू समोर चलनी नोटा आणि सोनेनाणे ठेवणे हे शुभ मानले जाते. तसेच असे करणे भाग्यदायी समजले जाते. दरम्यान, पूजा संपन्न झाल्यावर भाविकांकडून मिळालेले हे पैसे त्यांना परत केले जातात. हे पैसे मंदिराच्या ट्रस्टकडे जात नाहीत.