निकाल येण्यास विलंब, मात्र मिळाला न्याय - निर्भयाची आई
By admin | Published: May 5, 2017 04:52 PM2017-05-05T16:52:57+5:302017-05-05T20:21:08+5:30
संपूर्ण देशाला हादरा देणा-या निर्भया बलात्कार प्रकरणी सुप्रीम कोर्टानं दिल्ली हायकोर्टानं सुनावलेली दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवत ऐतिहासिक निर्णय दिला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - संपूर्ण देशाला हादरा देणा-या निर्भया बलात्कार प्रकरणी सुप्रीम कोर्टानं दिल्ली हायकोर्टानं सुनावलेली दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवत ऐतिहासिक निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी निकाल देताच कोर्टात उपस्थित असलेल्या निर्भयाची आई आशा देवी यांनी टाळ्या वाजवून निकालाचे स्वागत केले.
"निकाल येण्यास विलंब झाला असला, तरी आमच्या मुलीला न्याय मिळाला आहे. तसंच केवळ माझ्या मुलीलाच नाही तर संपूर्ण देशाला न्याय मिळाला आहे", अशी प्रतिक्रिया देत निर्भायाच्या आईनं सर्वांचे आभारदेखील मानले.
तर दुसरीकडे, "चारही दोषींना फाशीची शिक्षा गरजेची होती. यामुळे समाजात योग्य संदेश पोहोचण्यास मदत होईल. मात्र चारही आरोपींना फासावर लटकवण्यात आल्यानंतरच समाधान मिळेल", अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या वडिलांनी दिली.
दुपारी जवळपास 1 वाजून 15 मिनिटांनी निर्भयाचे आईवडील कोर्टातील मागील आसनावर येऊन बसले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे अनेक हितचिंतकदेखील उपस्थित होते. शुक्रवारी निर्भया बलात्कार प्रकरणाचा निकाल येणार असल्याची माहिती निर्भयाच्या आईला गुरुवारी मिळाली. निकालाची माहिती मिळाल्यापासून न्याय मिळवण्याबाबतच विचार करत होते, असे त्यांनी यावेळी सांगितले. यामुळे रात्रभर त्या झोपूही शकल्या नाहीत. सकाळी मुलीच्या फोटोकडे पाहून त्या निर्भयाला म्हणाल्या, "आज तुला सुप्रीम कोर्टाकडून न्याय मिळणार."
जेव्हा ही दुर्दैवी घटना घडली तेव्हा निर्भया 23 वर्षांची होती. आज जर ती जगात असती तर तिचे मेडिकल क्षेत्रातील शिक्षण पूर्ण झाले असते किंवा कदाचित तिचे लग्नदेखील झाले असते, असे सांगताना निर्भयाची आई भावूकही झाली. अखेर निर्भयाला न्याय मिळाला आहे. निर्भया बलात्कार प्रकरणी सुप्रीम कोर्टानं मुकेश सिंह, अक्षय ठाकूर, विनय शर्मा , पवन गुप्ता या चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवत महत्त्वपूर्ण निकाल दिला.
काय आहे निर्भया गँगरेप प्रकरण?
अल्पवयीन दोषीसह सहा जणांनी 16 डिसेंबर 2012 रोजी चालत्या बसमध्ये निर्भयावर बलात्कार केला होता. तसेच निर्भया व तिच्या मित्राला अमानुष मारहाण केली. यानंतर या दोघांना विवस्त्र रस्त्यावर फेकून त्यांच्यावर बस चालवण्याचा प्रयत्न केला. हे दोघं कित्येक तास विवस्त्र कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर पडून होते. या दरम्यान रस्त्यावरुन जाणा-या काहींनी त्यांना काही कपडे दिली व हॉस्पिटलपर्यंत पोहोचवले.
काही दिवसांनंतर निर्भयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने चार दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. त्यापैकी एक दोषी राम सिंहने जेलमध्येच आत्महत्या केली.निर्भया प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. संसदेतही बलात्कारसंबंधी कायद्यात बदल करण्यात आले आणि कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली.
साकेत येथील फास्ट ट्रॅक कोर्टाने चारही आरोपींना सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषी ठरवलं होते. चौघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचंही न्यायालयाने विशेष नमूद केलं होतं. कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा नक्की केल्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे सोपवण्यात आले. चारही आरोपींनीदेखील शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने 13 मार्च 2014 रोजी चारही आरोपी अक्षय ठाकूर, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि मुकेश यांच्या याचिका फेटाळून लावल्या आणि फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले.
#WATCH: Mother of #Nirbhaya, Asha Devi talks to ANI after SC upholds its earlier order of death sentence to the con… https://t.co/VZLvVvErKL
— ANI (@ANI_news) May 5, 2017