हरकतींच्या निकालाला विलंब, आज होणार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
By Admin | Published: March 24, 2015 11:07 PM2015-03-24T23:07:01+5:302015-03-24T23:43:37+5:30
जिल्हा बॅँक निवडणूक : पाचशे मतदार वाढले?
जिल्हा बॅँक निवडणूक : पाचशे मतदार वाढले?
नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या प्राप्त तक्रारी व हरकतींवर वेळापत्रकानुसार २३ मार्चला निकाल देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात २४ मार्चच्या सायंकाळपर्यंतही निकाल देण्यास विलंब झाल्याचे समजते. दरम्यान, जिल्हा बॅँकेच्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे २५ मार्चला अंतिम प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
दरम्यान, विभागीय सहनिबंधक तथा जिल्हा सहकार निवडणूक निर्णय अधिकारी एम. ए. आरिफ यांना नियोजित वेळापत्रकानुसार २३ मार्चलाच प्राप्त हरकतींवर निकाल देणे अपेक्षित असताना या निकालाबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आल्याचे, तसेच २४ मार्चच्या सायंकाळपर्यंत निकाल तयार करण्याचेच काम सुरू असल्याचे समजते.
अगोदर असलेल्या सुमारे चार हजारांच्या आसपास मतदारांमध्ये प्राप्त ५४७ तक्रारींपैकी बहुसंख्य तक्रारी या पाच हजार रुपयांच्या भागभांडवलाच्या असल्याच्या व त्या स्वीकारण्यात आल्याने जिल्हा बॅँकेच्या एकूण मतदारांमध्ये सुमारे पाचशेने वाढ झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या मतदारांची संख्या सुमारे साडेचार हजाराच्या घरात पोहोचल्याचे कळते. प्रत्यक्षात २५ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत यादी जाहीर झाल्यानंतरच मतदारांची अंतिम संख्या कळणार आहे. नियोजित वेळापत्रकानुसार २५ मार्च रोजीच यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, या अंतिम प्रारूप याद्या विभागीय सहनिबंधक व जिल्हा उपनिबंधक कार्यालयासह तालुका सहनिबंधक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या मतदार यादीवर ५४७ तक्रारी व ६९ हरकती प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सर्व ६९ तक्रारींवर निकाल देण्यात येणार आहेत.(प्रतिनिधी)
इन्फो..
बुधवारी होणार सुनावणी
दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने केलेल्या अपहार व भ्रष्टाचाराला स्थगिती देण्याच्या तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निर्णयाविरोधात, तसेच या दोषी संचालकांसह राज्य शासन व सहकार आयुक्त यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर बुधवारी (दि.२५) सुनावणी होणार असल्याचे समजते. आधी ही सुनावणी २० मार्चला होणार होती. जिल्हा बॅँकेचे माजी संचालक राजेंद्र भोसले यांनी ही याचिका दाखल केली आहे.