एअर इंडियासह तीन कंपन्यांच्या खासगीकरणाला होणार विलंब
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 03:20 AM2020-01-03T03:20:49+5:302020-01-03T07:06:43+5:30
मार्चनंतरच शक्य; दीड लाख कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न
मुंबई : केंद्र सरकारने एअर इंडिया, भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) व कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (कॉनकॉर) या सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्याचे ठरविले असले तरी ते या आर्थिक वर्षात, मार्चपर्यंत होण्याची अजिबात शक्यता नाही.
या कंपन्यांच्या खासगीकरणाची प्रक्रिया मार्चनंतर सुरू होईल. वरिष्ठ अधिकारी म्हणाला की, आम्ही खासगीकरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. ती पूर्ण होण्यास काही काळ नक्कीच लागेल. या विक्रीसाठी संबंधित कंपन्यांकडून इरादापत्रे येणे, त्यानंतर किमतीबद्दल वाटाघाटी आणि त्यानंतर अंतिम निर्णय, हे तीन महिन्यांत पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळेच या प्रक्रियेला विलंब होईल, असे दिसते. सरकारने एअर इंडियातील आपला १00 टक्के हिस्सा विकण्याचे ठरविले आहे. बीपीसीएलमधील ५३.२९ टक्के तर कॉनकॉरमधील ३0.८ टक्के विकण्याचा निर्णय घेतला आहे. कॉनकॉरमधील केंद्र सरकारचा हिस्सा सध्या ५४.८ टक्के इतका आहे. निर्गुंतवणुकीतून दीड लाख कोटी रुपये उभारण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. मात्र आतापर्यंत १७ हजार ३६४ कोटी रुपयेच मिळू शकले आहेत.
तूट भरून कशी काढणार?
उद्योग जगताला दिलासा देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट करामध्ये कपात केली. या निर्णयाने महसुलामध्ये आणखी घट होणार असून, ही तूट कशी भरून काढायची, हा केंद्र सरकारपुढील पेच आहे. निर्गुंतवणुकीतून मोठा निधी उभारून ही दरी भरून काढायचा सरकारचा मानस आहे.