मंत्र्यांमुळे विमानांना उशीर; अहवाल मागितला

By admin | Published: July 3, 2015 02:55 AM2015-07-03T02:55:41+5:302015-07-03T02:55:41+5:30

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांच्याशी संबंधित असलेल्या विमान उड्डाणातील विलंबाच्या दोन ताज्या घटनांबाबत

Delayed aircraft due to ministers; Report requested | मंत्र्यांमुळे विमानांना उशीर; अहवाल मागितला

मंत्र्यांमुळे विमानांना उशीर; अहवाल मागितला

Next

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांच्याशी संबंधित असलेल्या विमान उड्डाणातील विलंबाच्या दोन ताज्या घटनांबाबत नागरी उड्डयन मंत्रालयाने एअर इंडियाकडे अहवाल मागितला आहे. दुसरीकडे पंतप्रधान कार्यालयानेही (पीएमओ) विमानांच्या विलंबाबाबत नागरी उड्डयन मंत्रालयाकडे अहवाल मागितला आहे. फडणवीस आणि रिजिजू यांच्यामुळे एअर इंडियाच्या विमानांना विलंब झाल्याच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत.
‘आम्ही या दोन्ही घटनांवरील अहवालाची प्रतीक्षा करीत आहोत. एअर इंडियाला लवकरात लवकर अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे आणि अहवाल मिळाल्यानंतर कारवाई केली जाईल,’ असे नागरी उड्डयन सचिव आर.एन. चौबे म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान कार्यालयानेही नागरी उड्डयन मंत्रालयाकडे विमानांच्या उशिरा उड्डाणाबद्दल अहवाल मागितला आहे. व्हीआयपी प्रवास करीत असल्याने एअर इंडियाच्या विमानांना उशीर झाल्याबद्दल पीएमओने नागरी उड्डयन मंत्रालयाकडे अहवाल मागितला आहे, अशी माहिती सरकारी प्रवक्त्याने टिष्ट्वटरवर दिली.
गेल्या २९ जून रोजी फडणवीस यांना अमेरिकेला घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या मुंबई-नेवार्क विमानाला विलंब झाला होता. फडणवीस यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंग परदेशी यांनी सोबत वैध व्हिसा नसलेले पासपोर्ट आणल्याचे आयत्यावेळी लक्षात आल्याने विमान २० मिनिटे उशिराने आकाशात झेपावले होते.
दुसरी घटना २४ जून रोजी रिजिजू यांना लेहहून दिल्लीला आणणाऱ्या विमानाबाबत घडली होती.
रिजिजू, त्यांचा पीए आणि जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंग या तिघांना एयर इंडियाच्या लेह-नवी दिल्ली विमानात जागा मिळावी यासाठी एका बालकासह तीन प्रवाशांना विमानात बसण्यास मनाई करण्यात आली होती आणि त्यामुळे विमानाच्या उड्डाणाला उशीर झाला होता. (वृत्तसंस्था)

रिजिजू यांचा माफीनामा
लेह ते दिल्ली या एअर इंडियाच्या विमानाच्या उड्डाणास विलंब झाल्याबद्दल केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी माफी मागितली आहे. आपल्यामुळे अन्य प्रवाशांना विमानात बसण्यास मनाई करण्यात आल्याच्या घटनेबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे रिजिजू यांनी स्पष्ट केले.

माफी मागणार नाही -उपमुख्यमंत्री
जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंग यांनी मात्र या प्रकरणी माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला. ‘मी पदाचा दुरुपयोग केलेला नाही,’ असे सांगून निर्मल सिंग यांनी उलट वैमानिकावरच गैरवर्तन केल्याचा आरोप लावला.
राजू यांनीही मागितली माफी
एअर इंडियाच्या विमानांचे उशिरा उड्डाण केल्याबद्दल आणि व्हीआयपींना जागा देण्यासाठी अन्य प्रवाशांना विमानातून उतरविण्यात आल्याबद्दल नागरी उड्डयनमंत्री अशोक गजपती राजू यांनी जाहीर क्षमायाचना केली आहे.

‘विमानात व्हीआयपींना जागा मिळावी म्हणून काही प्रवाशांना विमानातून उतरविण्यात आल्याबद्दल आणि त्यामुळे विमानाच्या उड्डाणात विलंब झाल्याने अन्य प्रवाशांची गैरसोय झाल्याबद्दल नागरी उड्डयनमंत्री या नात्याने मी माफी मागतो.


जर नियमांचे उल्लंघन झाले असेल तर असे का झाले याची आम्ही विचारणा करू आणि यापुढे असे घडणार नाही, याची काळजी घेऊ,’ असे राजू यांनी म्हटले आहे.

Web Title: Delayed aircraft due to ministers; Report requested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.