अर्पण थॅलेसेमिया सोसायटी राष्ट्रीय परिषदेत सन्मानित
By Admin | Published: March 24, 2015 11:06 PM2015-03-24T23:06:46+5:302015-03-24T23:52:31+5:30
नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील १८१ थॅलेसेमियापीडित रुग्णांना अतिसुरक्षित नॅट टेस्टेड रक्ताचा मोफत पुरवठा करतानाच त्यांच्यावर वैद्यकीय उपचारही विनामूल्य करणार्या अर्पण थॅलेसेमिया सोसायटीच्या कार्याची दखल मुंबई येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय परिषदेत घेण्यात आली असून, सोसायटीचा उपक्रम एक रोल मॉडेल म्हणून संबोधिला गेला आहे. परिषदेत नामवंतांच्या उपस्थितीत सोसायटीला सन्मानित करण्यात आले आहे.

लालबाग येथे मुंबई हिमॅटोलॉजी या संस्थेच्या वतीने देशभरातील रक्तविकार तज्ज्ञांची (हिमॅटोलॉजिस्ट) राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. परिषदेत देशभरातील १५० हून अधिक प्रतिनिधींनी सहभागी होत उपक्रमांचे सादरीकरण केले. याचवेळी नाशिकच्या अर्पण थॅलेसेमिया सोसायटीच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून आयएमए शाखेच्या सहकार्याने चालविल्या जाणार्या थॅलेसेमिया केअर सेंटरची माहिती अर्पण रक्तपेढीचे डॉ. शशिकांत पाटील यांनी सादर केली. अर्पण थॅलेसेमिया सोसायटीच्या या कार्याने प्रभावित होऊन प्रख्यात रक्तविकार तज्ज्ञ डॉ. एम. बी. अग्रवाल यांनी सोसायटीच्या वतीने राबविली जाणारी उपचार पद्धती ही भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वोत्कृष्ट उपचार पद्धती असल्याचे गौरवोद्गार काढले. अत्याधुनिक तंत्राद्वारे नॅट टेस्टेड रक्तच अतिसुरक्षित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी अर्पण थॅलेसेमिया सोसायटीला नामवंतांच्या उपस्थितीत प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. परीक्षक म्हणून वाडिया हॉस्पिटलचे डॉ. मुकेश देसाई, डॉ. घोष, केईएमचे डॉ. फराह जीजीना यांनी काम पाहिले. याप्रसंगी अर्पण रक्तपेढीचे चेअरमन डॉ. नंदकिशोर तातेड, हिंदुजा हॉस्पिटलचे डॉ. आनंद देशपांडे, राजेश सावंत, टाटा हॉस्पिटलचे डॉ. राजाध्यक्ष आदि उपस्थित होते.
सोसायटीचा बहुमान
अर्पण थॅलेसेमिया सोसायटीमार्फत सेवाभावी वृत्तीने थॅलेसेमिया पीडितांवर मोफत उपचार केले जात आहेत. सोसायटीच्या याच कामाची पावती राष्ट्रीय परिषदेत मिळाली, हा आम्ही मोठा बहुमान समजतो. रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतेच आहे आणि त्यासाठी दात्यांचेही सहकार्य लाभते आहे.
- डॉ. नंदकिशोर तातेड,
चेअरमन, अर्पण रक्तपेढी
फोटो कॅप्शन-
अर्पण थॅलेसेमिया सोसायटीला रक्तविकार तज्ज्ञांच्या राष्ट्रीय परिषदेत गौरविण्यात आले. परिषदेत दिलेल्या प्रशस्तिपत्रासह डॉ. रत्नाकर कासोदकर, अर्पण रक्तपेढीचे व्हाईस चेअरमन डॉ. अतुल जैन, डॉ. शशिकांत पाटील व डॉ. स्नेहल पाटील.