कलम ३७० हटवल्याने सरदार पटेल यांचे स्वप्न साकार, मोदी यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 06:13 AM2019-08-16T06:13:39+5:302019-08-16T06:14:36+5:30
कलम ३७० हटवल्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वप्न साकार केल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : कलम ३७० हटवल्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वप्न साकार केल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशातील जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी कलम ३७० तुमच्या दृष्टीने आवश्यक असतानाही ते अस्थायी स्वरुपातच का ठेवण्यात आले, असा प्रश्न काँग्रेसला केला.
कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीर देशापासून वेगळा पडलेला असतानाही काँग्रेसने कलम ३७० हटवण्याच्या दृष्टीने कोणतेही पाऊल उचलले नाही. बदल करण्याची काँग्रेसची इच्छा नव्हती आणि हिंमतही नव्हती. कारण काँग्रेसला राजकीय भविष्याची चिंता होती. मात्र, माझ्यासाठी देशाचे भविष्य महत्त्वाचे असून राजकीय भविष्याला मी महत्त्व देत नाही, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकात्मतेसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. मात्र, कलम ३७० मुळे त्यांचे स्वप्न साकार होऊ शकत नव्हते. सध्या ‘एक राष्ट्र, एक संविधान’ या घोषणेची गरज असून ३७० आणि कलम ३५ ए हटवल्यामुळे वल्लभभाई पटेल यांचे स्वप्न साकार होण्याकडे एक पाऊल टाकले आहे. गेल्या ७० वर्षांत काश्मीर तोडण्याची भाषा करणारांना बळ देण्यात आले त्यामुळेच दहशतवादाचा जन्म झाला अशी टीकाही मोदी यांनी केली.
स्वप्नांना बळ देणार
जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या स्वप्नांना बळ मिळावे, याची जबाबदारी आपली आहे. या राज्यातील जनतेची सर्व स्वप्ने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.