'मोदीजी, आमच्या मुलांची लस परदेशात का पाठविली?', पोस्टरद्वारे सवाल करणाऱ्या १७ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 09:06 PM2021-05-15T21:06:16+5:302021-05-15T21:07:58+5:30
narendra modi poster case : दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 17 लोकांना अटक केली आहे. मात्र, यातील बहुतेकांना जामीनही मिळाला आहे.
नवी दिल्ली : दिल्लीत कोरोना लसीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात दिल्लीत लावलेल्या पोस्टरप्रकरणी आतापर्यंत एकूण 21 एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. याशिवाय, दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 17 लोकांना अटक केली आहे. मात्र, यातील बहुतेकांना जामीनही मिळाला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल कलम 188 अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. (delhi 17 got arrested and 21 firs registered in pm narendra modi poster case over corona vaccine)
गुरुवारी रात्री दिल्ली पोलिसांना माहिती मिळाली की, राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या विविध भागात पोस्टर लावण्यात आले आहेत. त्यावर 'मोदीजी, तुम्ही आमच्या मुलांची लस परदेशात का पाठविली?', असे लिहिले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पोस्टर्स कोणी छापले आणि कोणाच्या विनंतीवरून ते लावण्यात आले याचा शोध घेण्याचा प्रयत्न दिल्ली पोलीस करीत आहेत. हे पोस्टर्स पूर्व, उत्तर पूर्व, मध्य, उत्तर, रोहिणी आणि दिल्लीच्या द्वारका जिल्ह्यात लावण्यात आले होते.
दरम्यान, राजधानी दिल्लीसह देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची होणारी वाढ पाहता चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांची 3,26,098 नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात कोरोनामुळे 3,890 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मागील दिवसाच्या तुलनेत ही आकृती थोडीशी कमी असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर जनता आणि सरकार बेफिकीर होती - मोहन भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कोरोनासंदर्भात जनतेला आवाहन केले आहे. तसेच, कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर जनता आणि सरकार बेफिकिर राहिले. आता आपल्याला पॉझिटिव्ह राहूनच या संकटाचा मुकाबला करायला पाहिजे, असे मोहन भागवत यांनी सांगितले. 'पॉझिटिव्ह अनलिमिटेड' या कार्यक्रमाला मोहन भागवत संबोधित करत होते. पहिल्या लाटेनंतर सरकार आणि जनता बेफिकीर झाली होती. आता आपल्याला पॉझिटिव्ह राहावे लागेल. स्वत: कोविड निगेटिव्ह ठेवण्यासाठी सावधान राहावे लागणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता तर्कहिन वक्तव्येही टाळावी लागणार आहेत. ही परीक्षेची वेळ आहे. मात्र, सर्वांना एकजूट राहावे लागेल. एक टीम म्हणून काम करावे लागेल, असे मोहन भागवत यांनी सांगितले.
केंद्राकडून राज्यांना दिलेल्या व्हेंटिलेटरर्सचे ऑडिट करा, पंतप्रधानांचे आदेश
कोरोनाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शनिवारी उच्चस्तरीय बैठक बोलवली होती. या बैठकीत देशातील कोरोना स्थिती आणि लसीकरणाबाबत आढावा घेण्यात आला. तसेच, यावेळी केंद्राकडून देण्यात आलेले व्हेंटिलेटर्स काही राज्यांत धूळ खात पडून असल्याचे निदर्शनास आले होते. याची पंतप्रधानांनी गंभीरतेने दखल घेतली आहे. केंद्र सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्सच्या वापराचे तत्काळ ऑडिट करण्याचे आदेश पंतप्रधानांनी दिले आहेत. गरज भासल्यास आरोग्य कर्मचाऱ्यांना व्हेंटिलेटर्स वापरण्याचे प्रशिक्षण देण्याची तयारीही करण्यात यावे, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केल्याचे एका अधिकृत वक्तव्याद्वारे सांगण्यात आले आहे.