"नुसतं बोलून काही होणार नाही, सर्वांसमोर फाशी द्या", गौतम गंभीर दिल्लीतील 'त्या' प्रकरणावर संतापला!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 06:19 PM2022-12-14T18:19:20+5:302022-12-14T18:20:35+5:30
द्वारका परिसरात एका १७ वर्षीय मुलीवर अॅसिड हल्ला केल्याचं धक्कादायक प्रकरण उघडीस आलं आहे.
दिल्ली-
द्वारका परिसरात एका १७ वर्षीय मुलीवर अॅसिड हल्ला केल्याचं धक्कादायक प्रकरण उघडीस आलं आहे. या घटनेनंतर पीडितेला सफदरजंगच्या रुग्णालयात दाखल करण्यात असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर या घटनेवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. भाजपा खासदार गौतम गंभीरनंही दिल्लीतील अॅसिड हल्ला प्रकरणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. अॅसिड हल्ला करणाऱ्या त्या नराधमाला सार्वजनिकरित्या फासावर लटकवलं पाहिजे, असं रोखठोक मत गंभीरनं व्यक्त केलं आहे.
"फक्त शब्दांनी न्याय मिळत नाही. आपल्याला या जनावरांमध्ये भीती निर्माण करावी लागेल. द्वारका येथे शालेय विद्यार्थिनीवर अॅसिड फेकणाऱ्याला अधिकाऱ्यांकरवी सार्वजनिकरित्या फाशी द्यायला हवी", असं गौतम गंभीर म्हणाला.
केजरीवाल काय म्हणाले?
द्वारकामधील या भयानक घटनेबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, अशा प्रकारच्या घटना अजिबात सहन केल्या जाणार नाहीत. इतकी हिंमत होते तरी कशी? गुन्हेगारांना कडक शिक्षा मिळायला हवी. दिल्लीतील प्रत्येक मुलीची सुरक्षा आमच्यासाठी महत्वाची आहे.
दुसरीकडे दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालवाल यांनी ट्विट करत पीडित विद्यार्थीनीला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. तसंच देशात अॅसिडच्या खुल्या विक्रीवर निर्बंध लादण्यात सरकार अपयशी ठरल्याचीही टीका केली आहे.