शरजील इमामबरोबर तुम्ही आहात की नाही?, शहांचा केजरीवालांना थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 09:00 PM2020-01-27T21:00:55+5:302020-01-27T21:09:39+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहेत.
नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहेत. अनेक राजकीय पक्षांनी रॅली आणि दौरे काढले आहेत. भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रिठालामधल्या रॅलीमध्ये झोपडीच्या ऐवजी पक्कं घर देण्याचं आश्वासन दिलं आहे. यादरम्यान त्यांनी शाहीन बाग आणि शरजील इमामचा मुद्दा उपस्थित करत अरविंद केजरीवालांवर निशाणा साधला. 8 तारखेला भाजपाचं सरकार आल्यानंतर दिल्लीतल्या झोपडपट्टीवासीयांना पक्की घरं देण्यात येणार आहेत.
तुम्ही शरजील इमामचा व्हिडीओ पाहिलाच असेल. ज्यात तो बोलतोय कोंबड्याची मान उडवा, भारताला उत्तर-पूर्वमधून कापून टाका, त्यानं भारताचे तुकडे करण्याची भाषा वापरली आहे. मोदी सरकारनं दिल्ली पोलिसांना त्याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यास सांगितलं आहे. केजरीवालजी तुम्ही शरजील इमाम याच्याबरोबर आहात की नाही?, तुम्ही शाहीन बागच्या लोकांसोबत आहात की नाही, जनतेसमोर हे स्पष्ट करा, असं आवाहनच अमित शाह यांनी केजरीवालांना दिलं आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या 70 जागांवर 8 फेब्रुवारीला मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगानं तारखा जाहीर केल्यानंतर आचारसंहिताही लागू झाली. 21 जानेवारीला अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. दिल्लीत एकूण 1 कोटी 46 लाख मतदार आहेत. इथे यंदा आप, भाजपा आणि काँग्रेसचा थेट सामना होणार आहे.