Delhi Election 2020 : 'टुकडे-टुकडे गँग'वर खटला चालवण्यासाठी केजरीवाल परवानगी का देत नाही? : देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 12:40 PM2020-01-29T12:40:46+5:302020-01-29T12:51:06+5:30
Delhi Election 2020 : देशाचे टुकडे करू असे म्हणणाऱ्या लोकांच्या विरोधातील फाईल गेल्या 8 महिन्यांपासून दाबून ठेवण्यात आल्या असून, अशा देशद्रोह्यांवर कारवाई केजरीवाल का होऊ देत नाही याचे उत्तर त्यांनी द्यावे असेही फडणवीस म्हणाले.
नवी दिल्ली : दिल्लीत विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. देशाचे टुकडे करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांवर केजरीवाल कारवाई होऊ देत नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने वेगवेगळ्या राज्यांतील प्रमुख नेत्यांना त्यांच्या राज्यातील रहिवासी राहत असलेल्या भागात सभा घेण्याची जवाबदारी दिली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी देवळी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार अरविंद कुमार यांच्या समर्थनार्थ सभा घेतली. यावेळी त्यांनी शाहीन बाग आणि त्यातून उद्भवलेल्या परिस्थितीवरून केजरीवाल सरकारवर टीका केली.
फडणवीस म्हणाले की, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत देशात संभ्रमाची परिस्थिती निर्माण केली जात आहे. देशात ज्याप्रकारे परिस्थिती निर्माण केली जात आहे, त्यावरून देश पोकळ करण्यासाठी कट रचला जात असल्याचे स्पष्ट होत असल्याचे फडणवीस म्हणाले. तर काही लोकं एकत्रित जमा होतात आणि भारताचे टुकडे-टुकडे करून टाकू असे म्हणतात. मात्र अशा टुकडे-टुकडे गँगसोबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उभे आहेत, असा आरोपही फडणवीस यांनी यावेळी केला.
तर केजरीवाल यांच्यावर निशाणा साधताना फडणवीस म्हणाले की, जर तुम्ही देशाबरोबर असाल तर तुम्ही देश तोडण्याची भाषा करणाऱ्या आरोपींच्या खटल्यांच्या फाईल का दाबून ठेवत आहात. देशाचे टुकडे करू असे म्हणणाऱ्या लोकांच्या विरोधातील फाईल गेल्या 8 महिन्यांपासून दाबून ठेवण्यात आल्या असून, अशा देशद्रोह्यांवर कारवाई केजरीवाल का होऊ देत नाही याचे उत्तर त्यांनी द्यावे असेही फडणवीस म्हणाले.