हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 01:43 PM2024-11-26T13:43:06+5:302024-11-26T13:43:44+5:30
Delhi Assembly Election 2024:
मागच्या दोन महिन्यांच्या काळात भाजपाने हरयाणा आणि महाराष्ट्र ही देशातील प्रमुख अशी दोन राज्यं जिंकून लोकसभा निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीची काही प्रमाणात भरपाई केली आहे. आता या दोन राज्यांत सत्ता मिळवल्यानंतर भाजपाने मागच्या दहा वर्षांपासून अरविंद केजरीवाल यांच्या ताब्यात असलेल्या दिल्लीवर कब्जा करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. २०१३, २०१५ आणि २०२० अशा तीन विधानसभा निवडणुकांत दिल्लीमध्ये विजय मिळवण्यात अपयश आल्यानंतर आता भाजपाने आता केजरीवाल यांना नमवण्यासाठी नव्या ने रणनीती आखली आहे. तसेच २०१३ आणि २०२० मध्ये केलेल्या चुका टाळणार असल्याचे भाजपाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
भाजपा दिल्ली विधानसभा निवडणूक ही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित न करता लढण्याची शक्यता आहे. दिल्लीतील भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या संकेतांनुसार भाजपाचं वरिष्ठ नेतृत्वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराची यशस्वी रणनीती कायम ठेवण्यावर विश्वास आहे. त्याचा सकारात्मक परिणाम विविध राज्यांमधील निवडणुकीत दिसून आला आहे. मागच्या वर्षभरात झालेल्या महाराष्ट्र, झारखंड, हरयाणा, तेलंगाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपाने मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याची घोषणा केली नव्हती. यापैकी पाच राज्यांमध्ये भाजपाला विजय मिळाला. भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले की, वरिष्ठ नेतृत्वाने मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांची घोषणा न करता निवडणूक लढण्याची विविध कारणं होती.
भाजपा पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, हा दृष्टीकोन इतर राज्यांमध्ये लागू करण्यात आलेल्या त्यांच्या रणनीतीला अनुकूल आहे. त्याशिवाय, यामधून पक्षातील अतिरिक्त मतभेद रोखण्यास मदत करेल. तसेच या माध्यमातून निवडणुकीचा प्रचार हा व्यक्तिकेंद्रित न होता धोरणात्मक मुद्द्यांवर कायम राहतो. दिल्लीत दहा वर्षांपासून सत्तेवर असलेला आम आदमी पक्ष हा अँटी इन्क्मबन्सीचा सामना करत आहे. त्यामुळे आम्ही या निवडणुकीत चेहऱ्यांची लढत न घडवून आणता राज्यातील रस्त्यांची स्थिती, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरील खर्च आदी मुद्द्यांना महत्त्व देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
भाजपाने २०१५ मध्ये दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा देवून निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा भाजपाने माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केले होते. मात्र भाजपाची ही खेळी अपयशी ठरली होती. तसेच पक्षाला ७० पैकी केवळ ३ जागा मिळाल्या होत्या. तर २०१३ मध्ये भाजपाने हर्षवर्धन यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे केलं होतं. त्यावेळी भाजपा ३२ जागांसह मोठा पक्ष ठरला होता. मात्र त्यांना बहुमत मिळालं नव्हतं. तेव्हा आम आदमी पक्षाने २८ जागा जिंकत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. तसेच काँग्रेसच्या पाठिंब्यावर अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री झाला होते. तर २०२० मध्ये भाजपा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित न करता निवडणुकीत उतरला होता. मात्र तेव्हाही भाजपाला केवळ ८ जागा जिंकता आल्या होत्या.