आपच्या 'त्या' 8 आमदारांचा भाजपत प्रवेश, भ्रष्टाचाराचा आरोप करत कालच दिला होता राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 23:44 IST2025-02-01T23:43:11+5:302025-02-01T23:44:01+5:30

Delhi Assembly Election 2025 : या आमदारांनी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत पांडा आणि दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

Delhi Assembly Election 2025 Aam admi party's 8 MLA join BJP, had resigned yesterday alleging corruption | आपच्या 'त्या' 8 आमदारांचा भाजपत प्रवेश, भ्रष्टाचाराचा आरोप करत कालच दिला होता राजीनामा

आपच्या 'त्या' 8 आमदारांचा भाजपत प्रवेश, भ्रष्टाचाराचा आरोप करत कालच दिला होता राजीनामा

सध्या दिल्लीत विधानसभा निवडणुकीचे नगारे वाजत आहेत. यातच काल (शुक्रवार) एक-दोन नव्हे तर तब्बल ८ आमदारांनी राजीनामा देत आम आदमी पक्षाला मोठा धक्का दिला. महत्वाचे म्हणजे, या सर्वच्या सर्व आमदारांनी आम आदमी पक्षावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. यानंतर आज (शनिवार) या आठही आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला.  

या आमदारांनी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत पांडा आणि दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यात, जनकपुरी येथील राजेश ऋषी, पालम येथील भावना गौर, बिजवासन येथील बीएस जून, आदर्श नगर येथील पवन शर्मा, कस्तुरबा नगर येथील मदनलाल,  त्रिलोकपुरी येथील रोहित मेहरौलिया, मेहरौली येथील नरेश यादव आणि मादीपूर येथील गिरीश सोनी यांचा समावेश आहे. 

यावेळी बैजयंत पांडा म्हणाले, "आजचा दिवस ऐतिहासिक आहे, कारण दिल्ली निवडणुकीच्या काही दिवस आधीच एवढ्या मोठ्या संख्येने नेते 'आप-दे'तून मुक्त झाले आहेत. आता दिल्ली मुक्त होण्याची वेळ आहे. गेल्या १० वर्षांपासून आप केवळ खोटी आश्वासने देत आहे. जे लोक विश्वासाने त्यांच्या सोबत होते, आता ते त्यांना सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपमध्ये येत आहेत."

पक्षाचे नेतृत्व भ्रष्टाचार आणि हुकूमशाहीचा समानार्थी शब्द बनला आहे -
भाजप प्रवेश केलेल्या या आमदारांपैकी जनकपुरी येथून दोन वेळा आमदार राहिलेले राजेश ऋषी यांनी अरविंद केजरीवाल यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात, "पक्ष आपले मूलभूत सिद्धांत सोडून भ्रष्टाचारात बुडाला आहे. संतोष कोळी यांच्या खुन्याला तिकीट देण्यात आले, हा पक्ष कार्यकर्त्यांचा विश्वासघात आहे," असा आरोप केला आहे. एवढेच नाही, तर "आम आदमी पक्ष एका अनियंत्रित टोळीसाठी स्वर्ग बनला आहे. पक्षाचे नेतृत्व हे भ्रष्टाचार, घराणेशाही आणि हुकूमशाहीचा समानार्थी शब्द बनला आहे," असेही त्यांनी या पत्रात म्हटले होते.

...आम आदमी पक्ष स्वतःच भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकला -
मेहरौलीचे आमदार नरेश यादव यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले होते की, "भारतीय राजकारणाला भ्रष्टाचारापासून मुक्त करण्यासाठी भ्रष्टाचाराविरुद्धच्या अण्णांच्या आंदोलनातून आम आदमी पक्षाचा जन्म झाला. मात्र आता मला अत्यंत दुःख होत आहे की, आम आदमी पक्ष भ्रष्टाचार अजिबात कमी करू शकला नाही, उलट आम आदमी पक्ष स्वतःच भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकला आहे."

आजपासून, अशा संधीसाधू लोकांसोबतचे माझे नाते संपले -
त्रिलोकपुरी येथील आम आदमी पक्षाचे आमदार तथा दलित नेते रोहित कुमार मेहरौलिया यांनी 'X'वर आपल्या राजीनाम्याची प्रत शेअर केली आहे. यात, "ज्यांना बाबासाहेबांचा केवळ फोटो हवा आहे, त्यांचे विचार नकोत! आजपासून, अशा संधीसाधू लोकांसोबतचे माझे नाते संपले. मी आम आदमी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे."

आपल्याला केजरीवाल आणि पक्षावर विश्वास राहिलेला नाही -
पालम मतदारसंघातील आम आदमी पक्षाच्या आमदार भावना गौर यांनीही आपल्या पाच ओळींच्या राजीनाम्यात, "आता आपल्याला अरविंद केजरीवाल आणि पक्षावर विश्वास राहिलेला नाही, असे म्हटले होते. याशिवाय, कस्तूरबा नगरचे आमदार मदनलाल, बिजवासनचे आमदार भूपेंद्र सिंह जून आणि आदर्श नगरचे आमदार पवन शर्मा यांनीही पक्षावर आणि पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला होता.
 

Web Title: Delhi Assembly Election 2025 Aam admi party's 8 MLA join BJP, had resigned yesterday alleging corruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.