'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 03:29 PM2024-11-22T15:29:59+5:302024-11-22T15:36:11+5:30

Delhi Assembly Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी 'रेवडी पर चर्चा' या कार्यक्रमाचा शुभारंभ केला.

Delhi Assembly Election 2025: 'If BJP government comes, you will have to pay electricity and water bills', Arvind Kejriwal's criticism | 'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र

'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र

Delhi Assembly Election 2025 : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वांच्या नजरा दिल्ली विधानसभा निवडणुकीवार लागल्या आहेत. फेब्रुवारी 2025 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुका होणार असून, राज्यातील सत्ताधारी AAP ने याच्या तयारीला सुरुवात केली आहे. नुकतीच पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर आता आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी पक्षाच्या 'रेवडी पर चर्चा' कार्यक्रमाचा शुभारंभ केला. 

रेवाडी मोहिमेचा शुभारंभ करताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, आजपासून रेवडी मोहिमेला सुरुवात होत असून, आम्ही हे 'रेवडी पर चर्चा' अभियान प्रत्येक गल्लीपर्यंत घेऊन जाणार आहोत. दिल्लीच्या जनतेला मोफत सुविधा हव्या आहेत की नाही, हे त्यांच्याकडून जाणून घेऊ. दिल्लीच्या जनतेच्या पैशातून आम्ही त्यांना मोफत सुविधा देत आहोत, मग यात काय अडचण आहे? यावेळी केजरीवालांनी सहा रेवड्यांचा उल्लेखही केला. यासोबतच त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. 

भाजपशासित राज्यात वीज पुरवठा खंडीत होतो
दिल्लीत भाजपची आल्यास वीज आणि पाण्याची बिले भरावी लागतील, असे केजरीवाल म्हणाले. ते पुढे म्हणतात, दिल्लीत कधीही वीज कपात होत नाही. पण, भाजपशासित 20 राज्यांमध्ये 24 तास वीज नसते. गुजरातमध्ये 30 वर्षांपासून सरकार आहे. 30 वर्षांतही तेथे 24 तास वीज पुरवता आली नाही. दिल्लीतही भाजपचे सरकार आले, तर 8-10 तास वीजपुरवठा खंडित होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

'कमळाचे बटण दाबण्यापूर्वी विचार करा..'
केजरीवाल पुढे म्हणतात, कमळाचे बटण दाबण्यापूर्वी विचार करा. भाजपशासित राजस्थानमध्ये किती तास वीजपुरवठा खंडित होतो? संपूर्ण देशात दिल्ली आणि पंजाब ही दोनच राज्ये आहेत, जिथे आम आदमी पार्टीची सत्ता आहे आणि जिथे वीज मोफत दिली जाते. सरकार स्थापन होऊन जेमतेम 10 वर्षे झाली आहेत आणि आम्ही दिल्लीत 24 तास वीज मोफत देत आहोत. तुम्ही दिल्लीत भाजपला मतदान केले, तर तुम्हाला दर महिन्याला हजारो रुपयांचे वीज आणि पाणी बिल भरावे लागेल. 

केजरीवालांच्या सहा रेवड्या

  1. पहिली रेवडी- मोफत वीज, वीज कपात नाही
  2. दुसरी रेवडी - 20 हजार लिटर पाणी मोफत
  3. तिसरी रेवडी- मोफत आणि उत्कृष्ट शिक्षण
  4. चौथी रेवडी- उत्कृष्ट मोहल्ला क्लिनिक
  5. पाचवी रेवडी- महिलांसाठी मोफत बस प्रवास
  6. सहावी रेवाडी - वृद्धांसाठी मोफत तीर्थयात्रा

Web Title: Delhi Assembly Election 2025: 'If BJP government comes, you will have to pay electricity and water bills', Arvind Kejriwal's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.