निवडणुकीसाठी देणगी मागणाऱ्या आतिशींकडे किती संपत्ती? समोर आला आकडा; नावाचं कंफ्यूजन दूर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 17:42 IST2025-01-14T17:41:35+5:302025-01-14T17:42:12+5:30
गेल्या काही वर्षांपासून, त्याच्या नावाच्या पाटीवर केवळ 'आतिशी' एवढेच नाव लिहिलेले दिसत होती. त्या सोशल मीडियावरही त्यांचे आडनाव लिहित नाहीत...

निवडणुकीसाठी देणगी मागणाऱ्या आतिशींकडे किती संपत्ती? समोर आला आकडा; नावाचं कंफ्यूजन दूर!
राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. यातच आता, निवडणूक लढवण्यासाठी जनतेकडे देणगी मागणाऱ्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या संपत्तीचा खुलासा झाला आहे. महत्वाचे म्हणजे, त्यांच्या नावासंदर्भा असलेले कन्फ्यूजनही दूर झाले आहे. आतिशी यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांचे संपूर्ण नाव 'आतिशी मार्लेना' असल्या सांगण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून, त्याच्या नावाच्या पाटीवर केवळ 'आतिशी' एवढेच नाव लिहिलेले दिसत होती. त्या सोशल मीडियावरही त्यांचे आडनाव लिहित नाहीत. तसेच त्यांनी आपली एकूण संपत्ती ७६.९३ लाख रुपये असल्याचेही जाहीर केले आहे.
आतिशी यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात, आपल्या नावावर एकूण 76.93,374.98 एवढी जंगम मालमत्ता असल्याचे म्हटेल आहे. यात 30 हजार रुपये कॅश आणि 1 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिण्यांचा समावेश आहे. तर उरलेले जवळपास 75 लाख रुपए बँकेच्या बचत खात्यात आणि एफडीच्या स्वरुपात आहेत. तसेच शपथपत्रानुसार, त्यांच्या जवळ कुठलीही अचल संपत्ती नाही, कुठलेही घर अथवा कार नाही.
आतिशी मार्लेना यांनी म्हटले आहे की, २०२३-२४ मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न ९,६२,८६० रुपये, तर २०२२-२३ मध्ये ४,७२,६८० रुपये एवढे होते. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत कालकाजी मतदारसंघातून निवडणूक लढवताना त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण मालमत्ता १,४१,२१,६६३ रुपये असल्याचे जाहीर केले होते. तेव्हा, त्यात पतीच्या मालमत्तेचा उल्लेख होता. यावेळी त्यांनी केवळ स्वतःच्याच मालमत्तेची माहिती दिली आहे.
आतिशी पुन्हा एकदा कालकाजी मतदारसंघातूनच निवडणूक लढवत आहेत. त्यांनी निवडणूक खर्चासाठी क्राउड फंडिंगचे आवाहन केले आहे. निवडणूक लढवण्यासाठी आपल्याला ४० लाख रुपयांची गरज असल्याचे आतिशी यांनी म्हटले आहे. त्याना पहिल्याच दिवशी सुमारे १७ लाख रुपयांची मदत अथवा देणगी मिळाली आहे. दिल्लीतील सर्व ७० जागांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. आतिशी काँग्रेसच्या अलका लांबा आणि भाजप उमेदवार रमेश बिधुरी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत आहेत.