दिल्लीत भाजप सरकार आलं तर काय-काय मिळणार? अमित शाह यांनी 'संकल्प पत्र पार्ट-3' जारी करत सांगितलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 18:17 IST2025-01-25T18:16:08+5:302025-01-25T18:17:33+5:30

यात भाजपने यमुना नदी स्वच्छ करण्याचे, अनधिकृत वसाहतींना मालकी हक्क देण्याचे, कामगारांसाठी जीवन विमा आणि तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे.

delhi assembly election 2025 What will be achieved if BJP government comes to power in Delhi Amit Shah said while releasing BJP 'Sankalp Patra Part-3' | दिल्लीत भाजप सरकार आलं तर काय-काय मिळणार? अमित शाह यांनी 'संकल्प पत्र पार्ट-3' जारी करत सांगितलं 

दिल्लीत भाजप सरकार आलं तर काय-काय मिळणार? अमित शाह यांनी 'संकल्प पत्र पार्ट-3' जारी करत सांगितलं 

दिल्लीत सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक मैदानात उतरलेले सर्वच पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ-मोठ्या घोषणा करताना दिसत आहेत. यातच आज (शनिवारी) केंद्रीय गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शाह यांनी भाजपचे संकल्प पत्र -३ सादर केले. यात भाजपने यमुना नदी स्वच्छ करण्याचे, अनधिकृत वसाहतींना मालकी हक्क देण्याचे, कामगारांसाठी जीवन विमा आणि तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे.

यावेली अमित शाह म्हणाले, "आज मी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या संकल्पाचा शेवटचा भाग प्रसिद्ध करत आहे. या ठिकाणी मी कोणत्याही पक्षाचे नाव घेणार नाही. मात्र, आम्ही जी आश्वासने देतो, ती पूर्ण करतो. अनेकांनी दिलेल्या सूचनांनुसार, हे संकल्प पत्र तयार करण्यात आले आहे." यासंदर्भात सविस्तर बोलताना शाह म्हणाले, "जर भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला, तर १७०० अनधिकृत वसाहतींना संपूर्ण मालकी हक्क दिला जाईल. दिल्लीमध्ये १३००० दुकाने सील आहेत, ती ६ महिन्यांच्या आत पुन्हा खुली केली जातील. निर्वासित वसाहतींमध्ये भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या जमिनींना मालकी हक्क दिले जातील."

अमित शाह पुढे म्हणाले, "दिल्लीमध्ये भव्य महाभारत कॉरिडोर विकसित केला जाईल. मान्यताप्राप्त माध्यम प्रतिनिधी आणि वकिलांना १० लाख रुपयांपर्यंत जीवन विमा आणि १० लाख रुपयांपर्यंत आरोग्य आणि अपघात विमाही दिला जाईल."

यमुना रिव्हरफ्रंट तयार करणार - 
अमित शहा म्हणाले, भाजप सत्तेत आल्यानंतर, आपण साबरमती रिव्हर फ्रंटप्रमाणेच यमुना रिव्हर फ्रंट तयार करणार आहोत. हे काम तीन वर्षांत पूर्ण होईल. अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधताना शाह म्हणाले, "केजरीवाल म्हणाले होते की ते ७ वर्षांत यमुना पूर्णपणे स्वच्छ करतील आणि दिल्लीतील लोकांसमोर यमुनेत डुबकी मारतील. मी केजरीवालजींना आठवण करून देऊ इच्छितो की केजरीवालजी, लोक आपल्या जगप्रसिद्ध डुबकीची वाट बघत आहेत.

अमित शाह पुढे म्हणाले, "आम्ही तीन वर्षांत यमुना नदी स्वच्छ करणार आणि साबरमती रिव्हरफ्रंटच्या धर्तीवर एक रिव्हरफ्रंट विकसित करणार. मी अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबाला तीन वर्षांनंतर, यमुनेत डुबकी मारण्यासाठी आमंत्रित करतो"

तरुणांसाठी नोकऱ्या आणि वाहतूक क्षेत्रात गुंतवणूक -
भाजपने ५० हजार तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासनही दिले आहे. याच बोरबर, १३००० बसेस ई-बसमध्ये रूपांतरित केल्या जातील. २०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एकात्मिक सार्वजनिक वाहतूक नेटवर्क, दिल्ली १००% ई-बस शहर बनेल, मेट्रो फेज ४ चे काम लवकरच पूर्ण होईल, मेट्रो आणि बसेस २४x७ उपलब्ध असतील. याशिवाय, टेक्सटाइल वर्कर्सना १० लाख रुपयांचा जीवन विमा आणि ५ लाख रुपयांचा अपघात विमा देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.

Web Title: delhi assembly election 2025 What will be achieved if BJP government comes to power in Delhi Amit Shah said while releasing BJP 'Sankalp Patra Part-3'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.