'WiFi शोधता-शोधता बॅटरी संपते, तरीही मिळत नाही', अमित शाहांचा केजरीवालांवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 03:00 PM2020-01-06T15:00:42+5:302020-01-06T15:03:54+5:30
निवडणुकीच्या तोंडावर अरविंद केजरीवाल सरकारने घोषणा केल्याचा आरोप अमित शाह यांनी केला आहे.
नवी दिल्ली : झारखंडनंतर आता दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाकडून आज दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, याआधीच राजकीय पक्षांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची तयारी सुरु केली आहे. यातच दिल्लीतील विकासाच्या नावाखाली आपच्या नेतृत्वाखालील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारने येथील लोकांच्या डोळ्यात धूळ फेकल्याचा आरोप भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे.
राजधानी दिल्लीत सोमवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमात संबोधित करताना अमित शाह यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारवर हल्लाबोल केला. केजरीवाल यांनी दिल्लीत 15 लाख सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे सांगितले होते. मात्र, हे कॅमेरे कुठे लावले आहेत, याचा शोध दिल्लीतील जनता घेत आहे. वायफाय शोधता-शोधता लोकांच्या फोनमधील बॅटरी संपून जाते. पण, वायफाय काही मिळत नाही, असे सांगत अमित शाह यांनी अरविंद केजरीवाल सरकारवर निशाणा साधला.
याचबरोबर, निवडणुकीच्या तोंडावर अरविंद केजरीवाल सरकारने घोषणा केल्याचा आरोप अमित शाह यांनी केला आहे. दिल्लीत पाच वर्षांऐवजी पाच महिन्याचे सरकार चालले आहे. पाच वर्षात अरविंद केजरीवाल सरकारने काहीच केले नाही. फक्त गेल्या महिन्यात जाहिरातबाजी करून दिल्लीतील जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम केले, असा आरोप अमित शाह यांनी केला.
दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या पाच वर्षात दिल्लीत केलेल्या विकास कामांचा पाढा वाचण्यास सुरूवात केली आहे. दिल्लीवासीयांच्या अपेक्षांपेक्षा जास्त काम आम आदमी पार्टीच्या सरकारने केल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. तर, दिल्लीतील जनतेची फसवणूक केल्याचा आरोप अरविंद केजरीवाल सरकावर भाजपाने केला आहे.
(Delhi Election 2019 : 'आमचे सरकार आल्यास 600 युनिटपर्यंत मोफत वीज देणार')
(दिल्ली भाजपाचा सर्व्हे आला; उडू शकते केजरीवालांच्या आमदारांची झोप)
(चश्मा लावूनही शाळा, महाविद्यालय दिसत नाही; अमित शहा यांचा केजरीवालांना टोला)