“AAP च्या नवीन सरकारमध्ये मनिष सिसोदिया होणार उपमुख्यमंत्री”; अरविंद केजरीवालांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 21:48 IST2025-01-26T21:47:19+5:302025-01-26T21:48:53+5:30
Delhi Assembly Election 2025: भले २-४ जागा कमी येतील, परंतु, सरकार आम आदमी पक्षाचेच बनेल, हीच दिल्लीकरांची भावना आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

“AAP च्या नवीन सरकारमध्ये मनिष सिसोदिया होणार उपमुख्यमंत्री”; अरविंद केजरीवालांची घोषणा
Delhi Assembly Election 2025: दिल्लीत होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापताना पाहायला मिळत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तीव्र होत आहेत. इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि आम आदमी पक्ष एकमेकांविरोधात दिल्ली विधानसभा निवडणुका लढत आहे. इंडिया आघाडीतील अन्य पक्षांनी आम आदमी पक्षाला समर्थन दिले आहे. त्यामुळे काँग्रेस एकाकी पडल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे दोघांच्या भांडणाचा फायदा घेण्यासाठी तसेच कमबॅक करण्यासाठी भाजपा कंबर कसून तयारीला लागला आहे. यातच या निवडणुकीत अनेक आश्वासने दिली जात असून, आम आदमी पक्षाचे नवीन सरकार स्थापन झाले की, मनिष सिसोदिया उपमुख्यमंत्री असतील, अशी मोठी घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
दिल्ली निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासूनच अरविंद केजरीवाल मैदानात उतरले. अनेक आश्वासने देत पुन्हा विजयी होणार असल्याचा दावा ते करत आहेत. आम आदमी पक्षाचे सरकार पुन्हा येऊन दिल्लीकरांना काय काय मोफत देणार, याची यादीच ते मांडत आहेत. तर, भाजपा आणि काँग्रेस आम आदमी पक्षावर आणि आम आदमी पक्षाच्या सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. या रणधुमाळीत अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या नव्या घोषणेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
AAP च्या नवीन सरकारमध्ये मनिष सिसोदिया होणार उपमुख्यमंत्री
मनिष सिसोदिया आमचे सेनापती आहेत. भावाप्रमाणे असून, प्रिय आहेत. दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार बनत आहे. दिल्लीकर म्हणत आहेत की, भले २-४ जागा कमी येतील, परंतु, सरकार आम आदमी पक्षाचेच बनेल. दिल्लीत आम आदमी पक्षाचे नवे सरकार स्थापन झाल्यावर मनिष सिसोदिया उपमुख्यमंत्री असतील. तुमचा लोकप्रतिनिधी उपमुख्यमंत्री असेल, तर सगळे अधिकारी फोनवरूनच समस्या, प्रश्न सोडवतील. उपमुख्यमंत्री महोदयांचा फोन उचलणार नाही, अशी हिंमत कोणत्याही अधिकाऱ्यांमध्ये नाही, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ज्या लोकांना वीजबिल शून्यावर यायला हवे असेल, त्यांनी आम आदमी पक्षाला मतदान करावे. वीजबिलाच्या नावाखाली भरपूर पैसे भरायचे असतील त्यांनी भाजपाला मतदान करावे. भाजपावाले मोफत वीज देण्याच्या विरोधात आहेत. भाजपावाले सांगत आहेत की, त्यांचे सरकार आल्यास अनुदान समाप्त करतील. मनिष सिसोदिया यांना तुमच्याकडे सोपवले आहे. जंगपुराचा विकास १० पट अधिक करायचा आहे. जेवढी कामे प्रलंबित आहेत, तेवढी अतिशय वेगाने पूर्ण करायची आहेत, असे सांगत आम आदमी पक्षाला मतदान करण्याचे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केले.