"दिल्लीला 'घालमेल' नव्हे तर..."; द्वारका येथील सभेतून पंतप्रधान मोदी यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 17:55 IST2025-01-31T17:55:22+5:302025-01-31T17:55:51+5:30
delhi assembly elections 2025 : "दिल्लीला आधुनिक बनवण्याची भाजपची इच्छा आहे. याची एक झलक द्वारकेत दिसते. केंद्र सरकारने येथे भव्य यशोभूमी तयार केली आहे."

"दिल्लीला 'घालमेल' नव्हे तर..."; द्वारका येथील सभेतून पंतप्रधान मोदी यांचा हल्लाबोल
दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. नेतेमंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच, "यावेळी 'आप-दा' वाल्यांना घालवायचे आणि भारतीय जनता पक्षाला मोठ्या बहुमताने निवडून द्यायचे, असे दिल्लीतील जनतेने ठरवले आहे. तसेच, आता दिल्लीकरांना 'घालमेल' नव्हे तर 'ताळमेळ' असलेले सराकर अहवे आहे," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते शुक्रवारी दिल्लीतील द्वारका येथे एका रॅलीला संबोधित करत होते.
मोदी म्हणाले, "मी जेव्हा-जेव्हा द्वारकेला येतो, तेव्हा-तेव्हा मला भगवान श्रीकृष्णाच्या द्वारका नगरीची आठवण येते, हे स्वाभाविक आहे. गुजरातमधील द्वारकेची सेवा करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य आहे. दिल्लीला आधुनिक बनवण्याची भाजपची इच्छा आहे. याची एक झलक द्वारकेत दिसते. केंद्र सरकारने येथे भव्य यशोभूमी तयार केली आहे."
'संपूर्ण प्रदेश स्मार्ट सिटी बनेल' -
मोदी पुढे म्हणाले, “आगामी काळात हा संपूर्ण प्रदेश एक प्रकारची स्मार्ट सिटी बनेल. जगभरातून लोक इथे येतील, पर्यटन, व्यापार, व्यवसाय, सर्वकाही भरभराटीला येईल. येथे केंद्रातील भाजप सरकार भारत वंदना पार्क तयार करत आहे, जे संपूर्ण देशासाठी एक आदर्श ठरणार आहे. विकसित भारताची राजधानी अशीच असायला हवी. केवळ दिल्ली शहरच नाही, तर दिल्लीच्या ग्रामीण भागातील गावांसाठीही मॉडेल बनवले जाईल, हे काम भाजप करेल.
सर्वांना संधी दिली, आता भाजपला संधी द्या -
“दिल्ली एका सुरात म्हणत आहे, 'अब की बार भाजपा सरकार'. दिल्लीला केंद्र आणि राज्यात डबल इंजिन सरकारची आवश्यकता आहे. प्रथम आपण काँग्रेस पाहिली, नंतर आम आदमी पक्षाने दिल्लीत कब्जा केला. आता मला डबल इंजिन सरकार बनवून दिल्लीची सेवा करण्याची संधी द्या. मी गॅरंटी देतो की, भाजप सरकार दिल्लीच्या विकासात कोणत्याही प्रकारची कसर सोडणार नाही. गेल्या 11 वर्षांत 'आप-दा' ने केवळ सर्वांसोबत भांडणेच केली आहेत. हे 'आप-दा' केंद्र सरकार, हरियाणा आणि उत्तर प्रदेश वाल्यासोबत लढत राहतात," असेही मोदी यावेळी म्हणाले.