दिल्ली विधानसभा : भाजपकडून सुषमा स्वराज यांच्या कन्या देणार केजरीवालांना टक्कर ?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 10:45 AM2020-01-17T10:45:18+5:302020-01-17T10:46:40+5:30
Delhi Elections 2020 : बासुरी यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठातून आपली पदवी पूर्ण केली आहे. कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर बासुरी आपल्या पित्यासमवेत दिल्ली उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत.
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीला जोर चढण्यास सुरुवात झाली आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना रोखण्यासाठी काँग्रेस आणि भाजपकडून रणनिती तयारी करण्यात येत आहे. केजरीवाल यांच्या नवी दिल्ली मतदार संघात काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या कन्या लतिका दीक्षित मैदानात उतरण्याची शक्यता आहे. तर भाजपकडून माजी केंद्रीय विदेशमंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्या बासुरी स्वराज यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवी दिल्ली विधानसभा मतदार संघातून बासुरी स्वराज यांना उमेदवारी देण्यासंदर्भात पक्षात विचार सुरू आहे. बासुरी यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठातून आपली पदवी पूर्ण केली आहे. कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर बासुरी आपल्या पित्यासमवेत दिल्ली उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत.
बासुरी यांना विधानसभा निवडणुकीतसुषमा स्वराज यांच्या जाण्याने निर्माण झालेल्या सहानुभुतीचा लाभ होऊ शकतो. अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध लढणे त्यामुळे सोयीस्कर होईल, असा विचार भाजपचा आहे. बासुरी यांच्याआधी भाजपमधून कपिल मिश्रा यांचे नावही नवी दिल्लीतील उमेदवारीसाठी समोर आले होते. मात्र आता बासुरी स्वराज यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.