"दिल्लीचा मराठी माणूस पंतप्रधान मोदींच्या पाठीशी"; भाजपच्या विजयानंतर CM फडणवीसांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 18:47 IST2025-02-08T16:55:02+5:302025-02-08T18:47:23+5:30
आपच्या दारुण पराभवानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

"दिल्लीचा मराठी माणूस पंतप्रधान मोदींच्या पाठीशी"; भाजपच्या विजयानंतर CM फडणवीसांची प्रतिक्रिया
Delhi Assembly Elections 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून भाजपने २७ वर्षांनंतर दिल्लीत पुनरागमन केल्याचे आता स्पष्ट झालं आहे. दुसरीकडे आम आदमी पक्षालाही मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला असून पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज आणि इतर अनेक बडे नेतेही पराभूत झाले आहेत. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी पराभव स्वीकारला असून आपण लोकांसाठी काम करत राहू असे म्हटले आहे. दुसकीकडे या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं असून आम आदमी पक्षाला धक्का बसला आहे. त्यामुळे आता दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया या दोन मोठ्या नेत्यांचाही पराभव झाला आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटलेला आहे, असं म्हटल. तसेच भाजपचे सरकार दिल्लीमध्ये लोकांच्या आशा आकांक्षा निश्चितपणे पूर्ण करेल असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
"दिल्ली विधानसभेवर २७ वर्षांनी भाजपचा झेंडा रोवला गेला याचा मला अतिशय आनंद आहे. दिल्लीतील भाजपच्या तमाम कार्यकर्त्याचा आणि जनतेचे मी मनापासून अभिनंदन करतो. दिल्लीकरांनी हा विश्वास पंतप्रधान मोदी यांच्यावर दाखवला आहे. या विजयाने आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटलेला आहे. सातत्याने खोटी आश्वासने देऊन आणि लोकांना भटकवत ज्या प्रकारे त्यांनी राज्य केलं त्या परंपरेचा आज अंत झालेला आहे. खोटे राजकारण चालणार नाही हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिलं आहे. मला विश्वास आहे की दिल्लीची जनता लोकसभेतही पंतप्रधान मोदींवरच विश्वास दाखवायची, पण विधानसभेमध्ये आमची कुठेतरी पिछेहाट झाली होती. आता एक मोठा विजय हा दिल्लीतल्या जनतेने दिला आहे. हे विकासाला दिलेलं मत आहे. भारतीय जनता पार्टीचे सरकार हे दिल्लीमध्ये लोकांच्या आशा आकांक्षा निश्चितपणे पूर्ण करेल," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"अरविंद केजरीवाल यांनी अण्णा हजारे यांचा हात पकडून भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या माध्यमातून आपलं राजकारण सुरू केलं होतं. त्यानंतर ते भ्रष्टाचाराचे आयकॉन बनले. त्याचे उत्तर दिल्लीच्या जनतेने दिलं आहे. येणाऱ्या दिवसात भाजप दिल्लीकरांच्या जीवनात नक्कीच परिवर्तन आणेल," असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"माझ्या प्रचाराचा निवडणुकीवर परिणाम झालेला नाही. लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्याचे ठरवलं होतं. मला एवढाच आनंद आहे की या यज्ञामध्ये एखादी समिधा माझी पण आहे. त्यात दिल्लीचा मराठी माणूस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभा राहिला याचा मला मनापासून आनंद आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.