"विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात कॅगचा अहवाल मांडणार"; पंतप्रधान मोदींचा केजरीवालांना जाहीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 21:40 IST2025-02-08T20:02:12+5:302025-02-08T21:40:41+5:30

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरविंद केजरीवाल यांना इशारा दिला आहे.

Delhi Assembly elections Result Prime Minister Narendra Modi has warned Arvind Kejriwal | "विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात कॅगचा अहवाल मांडणार"; पंतप्रधान मोदींचा केजरीवालांना जाहीर इशारा

"विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात कॅगचा अहवाल मांडणार"; पंतप्रधान मोदींचा केजरीवालांना जाहीर इशारा

Delhi Assembly Elections Result: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले आहे. भाजपने २७ वर्षानी दिल्ली एवढा मोठा विजय मिळवला. सत्ताधारी आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला. नवी दिल्लीतून आपचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि जंगपुरामधून मनीष सिसोदिया या दिग्गज नेत्यांना निवडणुकीत पराभव व्हावं लागलं. दिल्लीतल्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या मुख्यालयातून कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. तसेच आप आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरविंद केजरीवाल यांना इशारा देखील दिला आहे.  भ्रष्टाचाराच्या प्रत्येक प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयात जाऊन कार्यकर्त्यांचे आभार मानले. "हा ऐतिहासिक विजय आहे आणि दिल्लीतून आपदा दूर झाली. दशकभराच्या आपदामधून दिल्ली मुक्त झाली आहे. या निकालात भाजप कार्यकर्त्यांच्या अहोरात्र मेहनत या विजयात भर घालत आहे. तुम्ही सर्व कार्यकर्ते या विजयासाठी पात्र आहात. या विजयाबद्दल भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी खूप खूप अभिनंदन करतो," असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कथित मद्य घोटाळ्यावरुन अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.
 

"दिल्लीतील आपदाने जनतेचा विश्वास आणि भावना पायाखाली चिरडल्या. हरियाणातील जनतेवर मोठा आरोप केला. त्यामुळे यमुनेला दिल्लीची ओळख बनवण्याची शपथ मी निवडणूक प्रचारादरम्यान घेतली होती. मला माहित आहे की हे काम कठीण आहे आणि खूप वेळ लागेल. पण कितीही वेळ गेला तरी चालेल. जिद्दीच्या बळावर आपण यमुना स्वच्छ करू आणि यमुना मातेच्या स्वच्छतेसाठी पूर्ण सेवेच्या भावनेने काम करू," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

"हे आपदाचे लोक राजकारणात बदल घडवून आणू असे सांगत राजकारणात आले होते. पण ते सरळसरळ बेईमान निघाले. अण्णा हजारे यांचे आजचे विधान मी ऐकलं. आपच्या लोकांच्या दुष्कर्मामुळे त्यांना खूप दिवसांपासून दुखः भोगावे लागत आहे. आज त्यांनाही या दुखण्यातून दिलासा मिळाला असेल. भ्रष्टाचाराविरोधातील चळवळीतून जन्माला आलेला पक्ष भ्रष्टाचारातच अडकला. ज्यांनी स्वतःला प्रामाणिकपणाचे दाखले दिले ते स्वतःच भ्रष्टाचारी निघाले. हा दिल्लीकरांच्या भरवशाचा विश्वासघात होता. दारू घोटाळ्यामुळे दिल्लीची बदनामी झाली. जेव्हा जग कोरोनाशी लढत होते, तेव्हा आपचे लोक शीशमहल बांधत होते. या आपदावाल्यांनी त्यांचा प्रत्येक घोटाळे लपवण्यासाठी रोज नवीन षडयंत्र रचले. पण आता दिल्लीचा जनादेश आला आहे. मी गॅरंटी देत आहे की पहिल्या विधानसभा अधिवेशनातच कॅगचा अहवाल सभागृहात ठेवला जाईल. भ्रष्टाचाराच्या प्रत्येक प्रकरणाची चौकशी होणार आहे. ज्याने लूट केली आहे ती परत करावी लागेल," असा इशारा पंतप्रधान मोदींनी दिला.

Web Title: Delhi Assembly elections Result Prime Minister Narendra Modi has warned Arvind Kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.